Join us

Success Story : माळरानावरील पडीक जमिनीचे केले सोने; शिवराजरावांच्या कष्टाचे पपईने फेडले पांग सारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:05 IST

Farmer Success Story :उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे.

गोविंद शिंदे 

उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून पिके जोपासण्यासाठी कष्ट घेतले तर चांगले उत्पन्न मिळते, याची प्रचिती नांदेड जिल्ह्याच्या धर्मापुरी (ता. कंधार) येथील शिवराज इंगळे या युवा शेतकऱ्याने दाखवून दिली आहे. इंगळे यांनी पपईच्या दोन हजार झाडांच्या माध्यमातून दहा लाखांचे विक्रमी उत्पन्न घेतले आहे.

धर्मापुरी या गावातील माळरानावर इंगळे यांची एक एकर जमीन आहे. पारंपरिक पिकाचे उत्पन्न व त्यासाठी येणारा उत्पन्न खर्च याचा अनेक दिवस ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी माळरानावरील पडीक जमिनीवर पपईचे पीक घेण्याचा निश्चय केला.

ज्याकरिता या पडीक जमिनीत माती आणि शेणखत टाकून तिला सुपीक जमीन केले. त्यानंतर त्यांनी या एक एकर जमिनीवर दोन हजार रोपे आणून पपई रोपाची सहा बाय सहा अंतरावर लागवड केली.

सोबत मल्चिंग करून पाणी व्यवस्थापन, आंतरमशागत, विविध प्रकारचे रोग नियंत्रण, खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन या सर्व बाबी नियोजनबद्ध पद्धतीने केल्या. 

सेद्रिंय शेतीमुळे फळांना मागणी

शिवराज इंगळे यांनी शेतातील फळबागाचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले आहे. परिणामी फळाची गुणवत्ता चांगली तयार होते. ज्यामुळे या फळाच्या मागणीसाठी हरियाणा व दिल्ली येथील व्यापारी त्यांची बाग खरेदीसाठी तत्पर असतात. विशेष की, एक पपई तीन ते चार किलो पर्यंत तयार झाली आहे.

पपईचे भरघोस उत्पादन

शेतात नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. वातावरण बदलानुसार पिकाची काळजी घ्यावी. योग्य खताचे डोस योग्य फवारणी केल्यास पपईच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्न मिळते. - शिवराज इंगळे, शेतकरी, धर्मापुरी.

हेही वाचा : Tomato Farming Success Story : एकरभर फळबागेवर भारी पडले टोमॅटो; वीस गुंठ्यात लाखोंचे उत्पन्न घेणारे शिवहार पाटील

टॅग्स :शेतकरी यशोगाथाबाजारशेतीफळेनांदेडमराठवाडाशेती क्षेत्र