रणजीत गवळी
शेती विकायची नसते तर शेती राखायची असते, कसायची असते. आपल्याकडे शेतीला काळं सोनं म्हणजेच 'ब्लॅक गोल्ड' म्हणून ओळखले जाते. काळी आई कितीही संकट आले तरीही बळीराजाला तारत असते.
पण, अलीकडे शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे सांगत शेती कसणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. शेतीऐवजी इतर उद्योगधंद्यांना प्राधान्य दिले जात आहे. परंतु, मांजरा पट्ट्यातील एका शेतकऱ्याला ४० गुंठ्यातील टोमॅटोने लखपती केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दाभा येथील शेतकरी संदीप टेळे यांनी एका एकरात टोमॅटोचे पीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
कळंब तालुक्यातील दाभा येथील संदीप रावसाहेब टेळे हे एक प्रयोगशील शेतकरी आहेत. दाभा हे गाव मांजरा पट्टयात येते आणि तेथील मुख्य पीक म्हणजे फक्त ऊस. पण ऊस पिकास बगल देत संदीप यांनी पारंपरिक पिकांची लागवड करण्याऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची शेती सुरू केली आहे.
विशेष म्हणजे भाजीपाला शेती कशा तन्हेने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, हे संदीप यांनी दाखवून दिले आहे. खरे तर संदीप इंजिनिरिंगमध्ये पदवीधर आहेत. मात्र, पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले असतानाही त्यांनी नोकरीऐवजी शेतीला प्राधान्य दाखवले आहे. त्यांनी टोमॅटोची झिगड़ोंग पद्धतीने लागवड केली. टीओ-६२४२ या जातीच्या टोमॅटोची त्यांनी लागवड ऐन उन्हाळ्यातील एप्रिल महिन्यात केली.
पाण्याच्या कमतरतेमुळे पिकास जेमतेम पाणी मिळाले. पाण्याचे होणारे बाष्पीभवन टाळण्यासाठी त्यांनी प्रत्येक गादीवाफ्यावर मल्चिंग केली. टोमॅटो पिकासाठी त्यांनी उत्कृष्ट मंडप बांधला. पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. उन्हामुळे प्लॉट सांभाळणे खूप अवघड होते.
लागवड केलेली रोपे दोन ते तीन वेळेस उन्हामुळे जळून गेली, पण हार न मानता त्यांनी पुन्हा नवीन रोपांची लागवड केली. त्यामुळे फायदा झाला. लागवडीसाठी एकरात दोन लाखाच्या आसपास खर्च झाला, पण योग्य नियोजनाने त्यांना टोमॅटो पिकातून चांगले उत्पादन मिळाले.
आतापर्यंत त्यांनी टोमॅटोचे चार ते सहा तोडे घेतले आहेत. त्यात त्यांना आतापर्यंत २०० कॅरेट माल निघाला आहे. विशेष म्हणजे आणखी काही दिवस त्यांना टोमॅटोचे उत्पादन मिळणार आहे. ४० ते ५० रुपये प्रति किलो या दराने टोमॅटोची विक्री होत असून, आतापर्यंत २ लाखापर्यंत कमाई झाली आहे. आणखी जवळपास ५ लाख रुपयांचे तरी उत्पन्न यातून पदरात पडेल, अशी त्यांना आशा आहे. त्यामुळे शेतीमध्ये सातत्य ठेवले तर लाखो रुपयांची कमाई करता येते, हे संदीप यांनी दाखवून दिले आहे.
आमचे गाव हे मांजरा धरणाच्या खाली येत येथील शेतकरी फक्त ऊस पिकास प्राधान्य देतात. पण मी ऊस पिकास बगल देऊन एक एकरात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटो लागवड करण्याची पहिलीच वेळ. पण योग्य नियोजनामुळे आतापर्यंत २०० कॅरेट माल विकला आहे. यातून २ लाखापर्यंत नफा मिळाला. आणखी ५०० कॅरेट माल निघण्याची आशा आहे. - संदीप टेळे, शेतकरी, दाभा.
हेही वाचा - मराठवाड्याच्या पैठण तालुक्यातील विजयराव; आषाढात कमवत आहे 'या' शेतीतून महिना लाख रुपये