Join us

Success Story : व्वा रे पठ्ठ्या! शेतकरी पुत्राने एका दिवसात विकला ३ लाखांचा झेंडू; अडीच लाखाचा नफा

By दत्ता लवांडे | Published: October 16, 2024 8:42 PM

"कष्टाने पिकवलेला शेतमाल विकायची लाज कसली?" असं म्हणत विनोदने पिकवलेल्या मालाची विक्री करत चांगला नफा कमावला आहे. 

Pune : शेतकरी शेतमाल पिकवतो पण त्याला विकता येत नाही असं आपण सर्रासपणे म्हणतो पण या वाक्याला फोल ठरवण्याचं काम सोलापुरातील विनोदने केलंय. स्वतःच्या शेतात पिकवलेला झेंडू विनोद आणि त्याच्या कुटुंबियांनी दसऱ्याच्या दिवशी आणि आदल्या रात्री पुण्यातील मार्केट यार्ड येथे थेट विक्री केला आहे. "कष्टाने पिकवलेला शेतमाल विकायची लाज कसली?" असं म्हणत विनोदने पिकवलेल्या मालाची विक्री करत चांगला नफा कमावला आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केत्तूर नं.२ येथील विनोदने पेरूच्या सव्वादोन एकर शेतामध्ये थे आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली होती. नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू तोडणीला येईल असे नियोजन केले होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात झेंडूची आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दसऱ्याच्या दोन दिवस आधी एका किलोला केवळ १० ते २० रूपयांचा दर मिळत होता. दसऱ्याच्या आदल्या दिवशी झेंडूचे दर हे ५० ते ७० रूपयांपर्यंत पोहोचले. पण हाच झेंडू ग्राहकांना १०० ते २०० रूपये किलोप्रमाणे विक्री केला जात होता. 

विनोदने दसऱ्याच्या आदल्या दिवशी पुणे मार्केट यार्डमध्ये तब्बल अडीच टन झेंडू आणला होता. पण बाजारात दर कमी असल्याने थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. दसऱ्याच्या आदल्या दिवशी आणि दसऱ्याच्या पहाटे असे दोन दिवस पुण्यातील मार्केट यार्ड बाहेर अतिशय चांगल्या किंमतीत झेंडूची थेट ग्राहकांना विक्री केली. एका दिवसांत विनोदने अडीच टन झेंडू १०० रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत विकला. 

ग्राहकांना केलेल्या थेट विक्रीमधून विनोदला अडीच टनाचे ३ लाख रूपये उत्पन्न मिळाले. पण या झेंडूला आत्तापर्यंत केवळ ४५ हजार रूपयांचा खर्च झाल्याचं विनोद सांगतो. यामुळे विनोदला पहिल्याच तोड्यातून तब्बल अडीच लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. ग्राहकांना थेट विक्री केली तर शेतकऱ्यांना किती फायदा होतो हे विनोदच्या या उदाहरणावरून दिसते. शेतकरी माल पिकवत असेल तर त्याला विक्री करण्याची लाज नसली पाहिजे असं तो सांगतो. विनोदची प्रयोगातून बहरत गेलेली शेती आणि विक्री व्यवस्था इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरते.

दोन महिन्यापूर्वी अडीच एकर पेरूमध्ये आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली होती. यासाठी मला आत्तापर्यंत ४५ हजाराचा खर्च आला. हा माल थेट व्यापाऱ्यांना विक्री केला असता तर केवळ १ लाख २० हजार ते दीड लाख रूपये मिळाले असते. पण पहिलाच तोडा थेट विक्री केल्यामुळे मला अडीच लाखांचा नफा झाला.  शेतकर्‍यांना आपण पिकवलेला माल विक्री करण्याची लाज नसली पाहिजे.- विनोद नवले (प्रयोगशील युवा शेतकरी,केत्तूर नं. २, ता. करमाळा, जि. सोलापूर)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीपुणेसोलापूर