सध्या शेतीत अनेक नवनवे प्रयोग होत असून यात डोंगर दऱ्यातील शेतकरी देखील हिरीरीने सहभागी होत आहेत. आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करत अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातही स्ट्रॉबेरीचे चांगले उत्पादन निघू शकते असा यशस्वी आणि इतर शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणारा प्रयोग शिरपुंजे येथील कृषीभूषण शेतकरी गंगाराम धिंदळे यांनी राबविला आहे.
गेल्या पंधरा वर्षांपूर्वी गंगाराम धिंदळे यांनी कठोर मेहनत घेत आपले १८ एकर क्षेत्र उभे केले. शेजारी असलेल्या लघुपाटबंधारे तलावातून त्यांनी आपल्या शेतात पाणी आणले. शेतात पाणी खेळू लागले आणि गंगाराम यांनी वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतात सुरू केले. पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत ते आपल्या शेतात भात पिकाबरोबरच इतर भाजीपाल्याची पिके घेऊ लागले आहेत. गांडूळ शेतीचा यशस्वी प्रयोग करीत ते सेंद्रिय पद्धतीने आपल्या शेतात पिके घेत आहेत. याला जोड म्हणून ते छोटेखानी कृषी पर्यटनही राबवत आहेत.
राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत असतानाच त्यांनी बाहेरील राज्यातही भटकंती करत शेतीचे नवनवीन प्रयोग आत्मसात केले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आपल्या चार गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडील जमिनीत व असणाऱ्या वातावरणात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येईल असा त्यांना आत्मविश्वास होता. यासाठी त्यांना वन्यजीव विभागाने एक हजार रोपे दिली. मल्चिंगचा वापर करत त्यांनी या क्षेत्रात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केली. यातील दोनशे रोपे खराब झाली. मात्र, हे क्षेत्र पडीक राहू नये म्हणून त्यांनी खराब झालेल्या स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या जागेवर कलिंगडाची रोपे लावली. आज या रोपांनाही चांगली कलिंगडे लागली आहेत.
योग्य नियोजन आणि व्यवस्थापन गरजेचे
योग्य व्यवस्थापन करत त्यांनी जगवलेल्या या आठशे झाडांना मागील महिन्यापासून चांगलीच स्ट्रॉबेरीची फळे लगडली आहेत. दर दोन-तीन दिवसांनी ते यातील पाच ते दहा किलो स्ट्रॉबेरी राजूर व परिसरातील बाजारपेठेत आणून विकत आहेत. शेतकरी गंगाधर धिंदळे म्हणाले कि, स्ट्रॉबेरीचे पीक घेणे सोपे आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत व्यावसायिक दृष्टिकोन जपत शेती केली तर इतर पिकांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीचे पीक चांगले परवडते. नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या ताज्या फळांना प्रति किलो दोनशे रुपये प्रमाणे स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत आहे. कमी क्षेत्रात ही लागवड केलेली असली तरी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यास आपल्या भागातही स्ट्रॉबेरीचे पीक घेता येऊ शकते.