Join us

केळवलीतील विलास हर्याण यांचा कोकणात ऊस लागवडीचा यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 10:20 AM

प्रयोगशील शेतकरी मात्र त्यावर नवीन पर्याय शोधतात. त्यापैकीच राजापूर तालुक्यातील केळवली येथील विलास हर्याण होत. त्यांनी तर लाल मातीत उसाची लागवड केली आहे. गेली सात वर्षे उसाचे उत्पन्न घेत असून उत्पादकता चांगली असल्याचे हर्याण यांनी सांगितले.

मेहरून नाकाडेपावसाचे कमी/अधिक प्रमाण, वन्यप्राण्यांचा उपद्रव यामुळे भात पिकाची उत्पादकता खालावत चालल्याने भात लागवडीचे क्षेत्रही कमी होत चालले आहे. प्रयोगशील शेतकरी मात्र त्यावर नवीन पर्याय शोधतात. त्यापैकीच राजापूर तालुक्यातील केळवली येथील विलास हर्याण होत. त्यांनी तर लाल मातीत उसाची लागवड केली आहे. गेली सात वर्षे उसाचे उत्पन्न घेत असून उत्पादकता चांगली असल्याचे हर्याण यांनी सांगितले.

विलास हर्याण यांना त्यांच्या मित्राकडून ऊस लागवडीची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला त्यांनी एकूण १२ एकर क्षेत्रावर ऊस लागवड केली होती. लाल मातीतील ऊस लागवडीचा त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे गेली सात वर्षे खरिपात उसाचीच लागवड करीत आहेत. कुटुंबाला वर्षभर पुरेल यासाठी एक एकर क्षेत्रावर भात लागवड करतात. उसाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या कांड्या (रोपे) कोल्हापूर येथून आणल्या होत्या. लाल मातीतील ऊस चवीला चांगला असतो. मात्र कमी पर्जन्यवृष्टीमुळे उसातील रस वाळतो. त्यामुळे पाऊस कमी झाला की, त्याला पाणी द्यावे लागते. यावर्षी पाऊस कमीच झाला मात्र अधूनमधून लागणाऱ्या पावसामुळे उसाला संजीवनी मिळाली आहे. परंतु विलास हर्याण सातत्याने पाणी देत असल्याने पीक चांगले आले आहे. राजापूर तालुक्यात ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

गगनबावडा येथील साखर कारखान्यासाठी विलास हर्याण ऊस घालत आहेत. ऊस तयार झाल्याचे कारखान्याला कळविल्यास कारखान्याच्या प्रतिनिधीकडून तपासणी केली जाते. नंतर ऊस कापणारी टोळी पाठवून ऊस कापणी करून नेली जाते. त्यामुळे उसाच्या पिकाला जास्त श्रमाची आवश्यकता नाही. शिवाय काढणीचाही ताप नाही.

दिवाळीनंतर ऊस कापणी सुरू होते. डिसेंबरपर्यंत हर्याण यांच्या शेतातील उसाची कापणी होणार असल्याचे सांगितले. योग्य खताची मात्रा व पाण्याचे व्यवस्थापन असेल तर उसाचे पीक चांगले येते, हे हर्याण यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या शेतातील भातही कापणीस तयार झाला असून पावसाचा अंदाज घेत कापणी करण्यात येत आहे. पाण्याची मुबलक व्यवस्था असेल व पुरेसे मनुष्यबळ असेल तर कोणत्याही प्रकारची शेती करता येते. कोकणच्या लाल मातीत पोषक गुणधर्म असल्याने विविध पिकाचे उत्पादन घेणे शक्य आहे. हर्याण यांचा ऊस लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. ऊस कापणीही वेळेवर होणे आवश्यक आहे अन्यथा रस वाळतो व गाळप चांगले होत नसल्याचे सांगितले.

पावसाने तारलेयावर्षी पाऊस हंगामापेक्षा उशिरा सुरू झाला. त्यानंतर मध्येच पाऊस गायब होता. पावसाचे सातत्य नसल्यामुळे एकूण पर्जन्यवृष्टीचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे ऊस वाळू लागल्याने हर्याण यांनी पंपाद्वारे पाणी द्यायला सुरुवात केली. शिवाय अधूनमधून पाऊस होताच. उसासाठी लागणारा पाणीपुरवठा योग्य पद्धतीने केल्यामुळे उसाला चांगले फुटवे आले, वाढ चांगली होऊ शकली आहे. पाण्याची उपलब्धता असेल तर ऊस लागवड शेतकऱ्यांनी करावी, नक्कीच फायदा असल्याचे हर्याण यांनी सांगितले.

तीन वर्ष एकच बेणंऊस लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून सरी पद्धतीने वाफ्यावर लागवड करावी. उसाची रोपे नर्सरीत उपलब्ध होतात. कोकण विद्यापीठ प्रमाणित को-७४०, को.एम ७१२५ (संपदा), को-७२१९ (संजीवनी), को-७५२७, को-९२००५, को-८६०३२ या जातींची शिफारस करण्यात आली आहे. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे एकच बेणं (वाण) बदलण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे शेतकरी ऊस लागवडीकडे वळू लागले आहेत. खरीप व रब्बी दोन्ही हंगामात उसाचे पीक शक्य आहे.

आंतरपीक शक्यऊस लागवडीनंतर कमी कालावधीत तयार होणारी आंतरपिके घेता येतात. लाल माठ, मुळा, गवार, काकडी, कोथिंबीर पिके शक्य आहेत. उसाच्या पिकावर या पिकांमुळे कोणताही अनिष्ट प्रकार न होता, वाढ चांगली होते. हर्याण कोथिंबीर, पालेभाज्यांचे आंतरपीक घेत आहेत. कारखान्याप्रमाणचे रस विक्रेत्यांकडून उसाला मागणी असल्याने ऊस पिकाची लागवड फायदेशीर आहे. लागवडीचा खर्च काढण्यासाठी ऊस लागवडीत आंतरपीक लागवड करून अन्य खर्च भागवला जातो.

पाणी व्यवस्थापनगरजेचे जानेवारी महिन्यात केलेल्या लागवडीच्या उसाला जानेवारी ते मे या कालावधीत ९ ते १० दिवसांच्या अंतराने १५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात लागतात. कोकणात जून ते ऑक्टोबर या महिन्यात उसाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही. तथापि पावसाळ्यात उसाच्या पिकातील साचलेले पाणी काढून टाकावे. उसाला सर्वसाधारणपणे १ नोव्हेंबरपासून तोडणीपर्यंत १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामातील लागवडीला मात्र पाणी कमी लागते.

टॅग्स :कोकणऊसभाज्यापाणीपाऊस