पुणे: तुम्ही पुण्यासारख्या शहरात राहता, तुम्हाला ताजा भाजीपाला आणि फळे खाण्याची इच्छा आहे किंवा प्रायोगिक तत्वावर शेती करायची आहे पण तुमच्याकडे शेती नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुण्यातील गगनचुंबी इमारतीच्या जंगलामध्ये "मृदगंध" नावाचा अनोखा शेत प्रयोग हौशी शेतकऱ्यांसाठी सज्ज आहे. अभिजीत ताम्हाणे आणि पल्लवी पेठकर या दोन तरूणांनी हा अर्बन फार्मिंगचा प्रयोग यशस्वी केलाय.
कोरोनाच्या लाटेत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बुडाले तर कित्येकजण मृत्यूमुखी पडले. पण या लाटेनंतर लोकांना आरोग्याचं महत्त्व कळालं. ताजा आणि सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला खाण्याची सर्वांना गरज वाटू लागली.
त्यामुळे नागरिकांना स्वत:च्या हाताने पिकवलेला ताजा भाजीपाला उपलब्ध व्हावा या उद्देशाने या तरूणांनी पुण्यासारख्या विकसित शहरामध्ये हा प्रकल्प सुरू केला. पुण्यातील वडगाव परिसरातील कोद्रे फार्म येथे हा अर्बन फार्मिंगचा प्रयोग मागच्या तीन वर्षापासून सुरू करण्यात आला आहे.
ज्या नागरिकांना स्वत:ची जमीन नसताना स्वत: पिकवलेला भाजीपाला खायचा आहे त्यांनी एक प्लॉट भाड्याने घ्यायचा आणि त्यांना ज्या पालेभाज्या हव्या आहेत त्या पालेभाज्या आणि फळांची लागवड करायची. तसं शक्य नसल्यास मृदगंधची टीम या तुम्हाला काम करण्यास मदत करते.
भाजीपाला लागवड करण्यापासून, निगा राखण्यापासून फवारणीपर्यंतची सगळी कामं मृदगंधची टीम करते. पण स्वतःच्या हाताने पिकवलेला ताजा भाजीपाला ताटात असणं याचं समाधान, मजा वेगळीच असते. ते समाधान पैशांत मोजता येत नाही असं मृदगंधचे सहकारी शेतकरी सांगतात.
मृदगंधकडून प्रत्येकी ७५० चौरस फुट आकाराचे ७५ प्लॉट्स तयार करण्यात आले आहेत. एका प्लॉटसाठी शेतकऱ्यांकडून प्रतिमहिना ३ हजार ७५० रूपये एवढी फी आकारली जाते.
ह्या साठी २५ हजार रूपये ही अॅडव्हान्स घेतले जातात. त्याचबरोबर रोपे, बियाणे, खतेसुद्धा मृदगंधने उपलब्ध करून दिले असून त्यासाठी साधारण २०० ते ३०० रूपये प्रति महिना वेगळे दर आकारले जातात. शेतकरी स्वतः सुद्धा बियाणे किंवा खते आणू शकतात अशी व्यवस्था केलेली आहे.
नोव्हेंबर २०२० साली विकी कोद्रे आणि आमची सहकारी पल्लवीच्या मदतीने आम्ही या अर्बन फार्मिंगची दोन प्लॉटपासून सुरूवात केली होती. सध्या आमच्याकडे ७५ प्लॉट्स आहेत. बऱ्याचवेळा आम्हाला नैसर्गिक संकंटांचासुद्धा सामना करावा लागला. मागच्या पावसामध्ये आमच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. या प्रयोगामुळे शहरातील नागरिकांना शेतकऱ्यांचेही दुख: समजते. - अभिजीत ताम्हाणे (मृदगंध)
शहरी लोकांना आणि शहरात वाढणाऱ्या लहान मुलांना शेतकऱ्यांचे कष्ट कळावेत, पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत काय अडचणी असतात, याची जाणीव आणि अन्नधान्याचे महत्त्व कळावे, त्याचबरोबर ताण, तणाव विसरून प्रत्येकाला शेतीचा आनंद देण्याचा हेतू यामागे आहे. - पल्लवी पेठकर (मृदगंध)
आम्ही गेल्या तीन वर्षांपासून मृदगंधशी जोडले गेलेलो आहोत. आम्हाला पालक, चुका, लाल माठ, मिरची, गोबी, दोडका, टोमॅटो अशा रसायन न मारलेल्या आणि आमच्या डोळ्यासमोर पिकवलेल्या भाज्या फार्म टू थेट प्लेट खायला मिळतात याचा आनंद आहे. त्याचबरोबर आम्हाला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीवही यामुळे होते त्यामुळे अन्न वाया न घालवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. - हेमंत कुलकर्णी (मृदगंधचे शेतकरी)