Join us

Successful Women Business Story : शर्मिला ताईंच्या गृहउद्योगाने दिला मेट्रो सिटींना मराठवाडी लोणच्यांचा स्वाद

By रविंद्र जाधव | Published: October 05, 2024 9:02 AM

अल्पशा गृहउद्योगात सातत्य आणि चविष्ट दर्जा राखत शर्मिला ताई (Sharmila Jige) आज मेट्रो सिटीला मराठवाडी (Marathwada) लोणचे (Pickles) पुरवत आहेत. यासोबतच त्यांच्या गृहउद्योगाने पाच महिलांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

अल्पशा गृहउद्योगात सातत्य आणि चविष्ट दर्जा राखत शर्मिला ताई आज मेट्रो सिटीला मराठवाडी लोणचे पुरवत आहेत. यासोबतच त्यांच्या गृहउद्योगाने पाच महिलांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील मठपिंपळगाव तालुक्यातील अंबड येथील शर्मिला शिवाजीराव जिगे यांनी २०१३ मध्ये कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत फळ प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. ज्यातून प्रेरणा घेऊन २०१४ मध्ये त्यांनी अनुज फूड प्रॉडक्ट नावाने एक छोटासा गृहउद्योग सुरू केला.

लोणचं, पापड, चकली, कुरडई अशा पदार्थांची निर्मिती करून या गृहउद्योगाद्वारे त्यांची विक्री केली जाते, ज्याला स्थानिक बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला. मागणी विचारात घेता गेल्या दहा वर्षांच्या प्रवासात त्यांनी आपल्या गृहउद्योगाला काही प्रमाणात आधुनिक तसेच यांत्रिकीकरणांशी जोडून नाविन्यपूर्ण आणि चविष्ट ब्रँड म्हणून ओळख निर्माण केली आहे.

विविध प्रकारचे लोणचं

लिंबू मिरची, गोड लिंबू, आंबा, तीळ, कऱ्हाळे, मोहरी, आवळा अशा विविध चविंमध्ये जिगे लोणचं तयार करतात.

बारामाही प्रवाही उद्योग

जिगे ताई यांच्याकडे दालमिळ आहे, ज्याद्वारे त्या घरच्या स्वतःच्या शेतातून तर कधी बाहेरून विकत घेतलेल्या तुर, मूग, हरभरा पासून डाळ तयार करतात. त्यानंतर या डाळीचे आकर्षक पॅकिंग करून विक्री केली जाते. उन्हाळी हंगामात मूग, उडीद, नागली, तांदूळ यापासून पापड तयार केले जातात. यासोबतच दिवाळी सणाच्या वेळी फराळ तयार करून त्याची देखील विक्री केली जाते. तसेच कुरडई, चकली असे पदार्थ मागणीनुसार तयार करून दिले जातात.

शेतातचं पिकतात लिंबू

वाढलेली मागणी लक्षात घेता लोणचं बनविण्याकरिता जिगे यांनी घरच्या पाच एकर क्षेत्रात कागदी लिंबूची लागवड केली आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे वार्षिक तीन बहार या बागेत घेतले जातात.

उमेदसह विविध प्रदर्शनात स्टॉल लाऊन विक्री

जिगे यांच्याकडे तयार होणाऱ्या विविध उत्पादनांची विक्री उमेद मार्टवर ऑनलाइन होते. तसेच राज्यातील विविध प्रदर्शनात देखील स्टॉल लाऊन विक्री केली जाते. जिगे यांनी सोलापूर, पुणे, मुंबई, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी आपले विक्रेते नेमले असून त्यांच्या माध्यमातून त्या-त्या भागात उत्पादनांची विक्री केली जाते.

आज वयाची ५० ओलांडली असून तरीही मोठ्या उमेदीने मी आमचा गृहउद्योग कुटुंबाच्या मदतीने विस्तारला आहे. यात अनेक अडचणी आल्या, मात्र गेल्या दोन वर्षांत चांगली भरभराट झाली असून त्यातून आता अधिक ऊर्जा मिळत आहे. सध्या अनेक नवतरुण विविध उद्योग व्यवसायात येत आहेत आणि ते अल्पावधीत यश मिळविण्याच्या मागे असतात. मात्र उद्योग व्यवसायात संयम फार महत्त्वाचा असतो. तो असेल तर यश नक्कीच मिळते. त्यासोबत आपली गुणवत्ता टिकविणे देखील गरजेचे आहे. - सौ. शर्मिला शिवाजीराव जिगे.

Varsha's Desi Cow Goshala : सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

टॅग्स :जागर "ती"चाशेती क्षेत्रशेतकरीशेतीजालनाअन्ननवरात्री