Join us

Successful Women : 'मर्दानी बैलगाडा शर्यती'त सिमाताईंचा डंका! 'ते' वाक्य मनाला लागलं अन्...

By दत्ता लवांडे | Published: October 06, 2024 9:01 AM

Successful Women Seema Patil : बैलगाडा शर्यतीतील महाराष्ट्रातील एकमेव महिला ड्रायव्हर म्हणून विदर्भातील बुलढाणा येथील सीमा पाटील यांनी मान मिळवलाय. "हे बायकांचं काम नाही, बायका या मर्दानी खेळात काम करू शकत नाहीत" असा सल्ला त्यांना जुन्या जाणत्या मंडळींनी दिला. पण या सल्ल्याचा राग त्यांना आला. पुरूष जे काम करू शकतो ते काम महिला का नाही करू शकत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि पुरूषांच्या नाकावर टिच्चून मी शंकरपटातील धुरेकरी होणार असा 'पण' त्यांनी केला.

"आरं हे काय बायांचं काम हाय व्हय...? बायकांनी घरातलीचं काम करावीत, उगं आपलं गड्या माणसांच्या मधीमधी करू न्हायी. आन् शंकरपटातल्या शर्यती म्हंजी बायांचा ख्योळ वाटला व्हय? गड्यांच्या मर्दानी खेळात तुझं काय काम न्हाय, आन् तुला हे जमनार बी न्हाय. गप गुमान घरातली कामं कर..." वयाच्या अगदी १२व्या वर्षी हे वाक्य कानावर पडले अन् तेव्हापासून 'ती' जिद्दीला पेटली. गड्यांच्या नाकावर टिच्चून बैलगाडा शर्यतींमध्ये नाव कमावणं हेच 'ति'च्या उभ्या आयुष्यातील ध्येय झालं अन् तिने करून दाखवलं. दानवांचे नामोहरण करून विजय मिळवलेल्या 'रणरागिनी'सारखाच तिचा हा प्रवास... शंकरपट शर्यतीच्या इतिहासातील एकमेव महिला धुरेकरी/ड्रायव्हर म्हणून नाव कमावलेल्या महिलेची ही कहाणी. बैलगाडा शर्यती हा पुरूषांचा मर्दानी खेळ आहे अशी पुरूषी मानसिकता असलेल्यांच्या नांग्या ठेचून पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या छताडावर पाय रोवून तोऱ्यात उभ्या असलेल्या सीमा पाटील यांची ही कहाणी... 

९० च्या दशकातील तो काळ. गावोगावी पारंपरिक पद्धतीने शंकरपटाचे आयोजन होत असे. तसं पाहिलं तर बैलगाडा शर्यती ही महाराष्ट्राला लाभलेली परंपरा. पंढरीच्या वारीची आणि शर्यतीच्या  बारीची परंपरा महाराष्ट्राला लाभल्याचं बोललं जातं. पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात घाट शर्यती, साताऱ्यातील छकडी, सांगलीतील आरत-पारत अन् विदर्भातील शंकरपट शर्यती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात शर्यतशौकिनांची कमी नाही. घाटात ठाण मांडून दिवस-दिवस घालवणारे पठ्ठे आपल्याला शर्यत घाटात किंवा मैदानात बघायला मिळतात.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील ज्ञान गंगापूर येथील सीमा पाटील यांना लहानपणापासूनच बैलगाडा शर्यतीची आवड. वडील बैलगाडा शर्यतीमधील प्रसिद्ध मालक असल्यामुळे आपल्या मुलीच्या हट्टपायी ते सीमा यांना बैलगाडा शर्यतीसाठी घेऊन जात असत. वडील आणि भावंडांकडे पाहून सीमा यांना खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीचा नाद लागला. 

जसंजसं वय वाढत होतं तसं सीमा यांना बैलगाडा शर्यतीपासून लांब राहण्याचा सल्ला पुरूष मंडळींकडून देण्यात येत होता. "हे बायकांचं काम नाही, बायका या मर्दानी खेळात काम करू शकत नाहीत" असा सल्ला त्यांना जुन्या जाणत्या मंडळींनी दिला. पण या सगळ्या गोष्टींचा त्यांना राग आला. पुरूष जे काम करू शकतो ते काम महिला का नाही करू शकत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि पुरूषांच्या नाकावर टिच्चून मी शंकरपटातील धुरेकरी होणार असा 'पण' त्यांनी केला.

लेकीच्या हट्टापुढे वडिलांनीही हात टेकले आणि त्यांना बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी दिली. तिथून पुढे खऱ्या अर्थाने सीमा यांचा संघर्षमय प्रवास सुरू झाला. बैलगाडा हाकणारी धुरेकरी म्हणजेच ड्रायव्हर होण्याचं प्रशिक्षण त्यांनी घरीच घेतलं. पुढे शंकरपटातील शक्य होईल तेवढ्या शर्यतीमध्ये त्यांनी भाग घेतला. वेगवेगळ्या बैलांना घेऊन मैदानात उतरल्या आणि बक्षिसांची खैरात करवून घेतली. सीमा पाटील या महिलेने खऱ्या अर्थाने शंकरपटातील शर्यती लढल्या अन् गाजवल्याही. 

सीमा पाटील हे नाव महाराष्ट्रातील शर्यत शौकिनांमध्ये प्रसिद्ध आहे. शंकरपट शर्यतीशी संबंधित असणारा प्रत्येकजण सीमा पाटील यांना ओळखतो. त्या ज्या शर्यतीमध्ये सहभाग घेतात त्या शर्यती पाहण्यासाठी लोकांची गर्दी होते. सीमा या आता शंकरपटातील सिलेब्रिटी झाल्या आहेत. बक्षिस अन् सन्मानपत्रांनी त्यांचं घर भरलंय. 

मागील ३० वर्षांपासून सीमा बैलगाडा शर्यतीमध्ये सक्रीय आहेत. वडिलांच्या आणि भावांच्या भक्कम साथीमुळेच मी इथवर पोहोचल्याचं सीमा आज सांगतात. बैलगाडा शर्यती हा पुरूषांचा मर्दानी खेळ आहे अशी पुरूषी मानसिकता असलेल्यांच्या नांग्या ठेचून ही रणरागिनी या पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या छताडावर पाय रोवून तोऱ्यात उभी आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रजागर "ती"चामहिला