Sugarcane export: वेगवेगळी फळे पाल्याभाज्या आतापर्यंत परदेशात निर्यात केल्या जात होत्या. मात्र, पारगाव तालुका दौंड येथील शेतकऱ्याने उसाची निर्यात करून ही उसाची गोडी आखाती देशांपर्यंत पोहोचवली आहे. आखाती देशात दुबई, सौदी अरेबिया, ओमान येथे उसाची ८६०३२ ही प्रजाती पाठवली गेली आहे. पारगाव, ता. दौंड येथील दीपक खंडेराव ताकवणे व दीपक खंडेराव ताकवणे या भावंडांनी ऊस निर्यात केला आहे.
पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून १९.२८० टन ऊस ताकवणे बंधूंनी पाठवला आहे. १२ ते १३ महिने उसाची लागवड केलेली असावी लागते. उसाच्या कांड्यामध्ये रस जास्त पाहिजे. आखाती देशांमध्ये सध्या उष्णतेचे प्रमाण आपल्यापेक्षा जास्त आहे. त्या ठिकाणी ज्यूस बनवण्यासाठी उसाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ऊस उभा व सरळ असल्यावरच घेतला जातो. त्याची साधारण उंची ७ ते ८ फूट असायला हवी.
त्यामध्ये शर्करेचे प्रमाण १६ ते १८ टक्के पाहिजे. निर्यातीसाठी ऊस द्यायचा असल्यास त्याची बांधणी योग्य वेळी केलेली असायला पाहिजे. पारंपरिक लागवडीऐवजी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केल्यास बरोबर पुढच्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात ऊस तोडणीस येतो. त्यामुळे या दोन महिन्यांमधील लागवडीला विशेष प्राधान्य मिळते.