तुकाराम पठारे
वाळकी रांजणगाव सांडस बेट परिसरात मुळा, मुठा, भीमा नद्यांचा संगम झालेला आहे. या भागात शेतीला वर्षभर पाणी दौंड शिरूर तालुक्यातील नदी काठावरील गावांना शेतीसाठी पुरवठा होतो. नदीकाठच्या परिसरातील जमिनी क्षारपड झालेल्या असूनही या भागातील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात उसाचे १०५ टन उत्पादन मिळवले आहे. शेतात नवनवीन प्रयोग केल्यास शेती ही अधिकचे उत्पादन देत असते हे त्यांनी दाखवून दिले आहे.
जून महिन्यात कांदा पीक काढल्यानंतर शेतात पहिली आडवी उभी नांगरट करून घेतली. त्या शेतात शेणखत टाकून कल्टीवेटर मारून दुहेरी नांगरट केली. १५ जूनला ऊस लागवड हंगामानुसार शेतात ८६,०३२ उसाची लागवड केली. त्यानंतर सेंद्रीय खताचा डोस दिला. त्यानंतर काही दिवसांनी उसाची पक्की बांधणी केली. पाणी योग्य नियोजन केल्याने, अंग मेहनत, सेंद्रीय खताची योग्य मात्रा यांचा वापर केला. या सर्व मेहनतीमुळे ऊस सुमारे ४५ ते ५० कांडींवर होता. १४ महिन्यात एकरी १०५ टन ऊस उत्पादन काढण्यास थोरात यांना यश मिळाले आहे. हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शेतात भेट देत आहेत.
थोरात यांनी आपला ऊस हा स्थानिक पातळीवरील गुन्हाळाला दिला. एकरी १०५ टन ऊस उत्पादन थोरात यांनी घेतल्याची माहिती मिळताच माजी आमदार रमेश थोरात, संचालक भाऊसाहेब भोसले, दिलीप हाके, दत्तोबा तांबे, संजय गरदडे, राजेंद्र खळदकर यांनी ऊस शेतीस भेट दिली.
मेहनत, जिद्द, कष्ट करण्याची ताकद
- युवकांनी शेतीत नवनवीन प्रयोग राबवून शेतीही भरघोस उत्पन्न देत असते. बाजारभावाची अपेक्षा न ठेवता मेहनत, जिद्द, कष्ट करण्याची ताकद असल्यास शेतीच भारी ठरत आहे, असे शेतकरी संजय थोरात यांनी सांगितले.
- नदीकाठच्या परिसरातील जमिनी क्षारपड झालेल्या असूनही या भागातील शेतकरी संजय किसनराव थोरात यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात उसाचे १०५ टन उत्पादन मिळवले आहे. तसेच त्यांनी ऊस गुन्हाळास देऊन उच्चांकी उत्पादनाचा आर्थिक फायदा घेतला आहे.