महेश घोलप
ओतूर: उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरून एका एकरात विक्रमी असे १२६ टन उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
ऋषिकेश तांबे (रा.ओतूर ता.जुन्नर) असे शेतकऱ्याचे नाव आहे यांनी आपल्या १ हेक्टर ४७ गुंठे जमिनीत साधारण ४६३.४९० मे. टन ऊस उत्पन्न घेतले त्यात ४५ ते ५२ कांड्यापर्यंत ऊस सापडला. जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला आपला ऊस दिला आहे.
ऋषिकेश तांबे यांनी ऊस लागवड करण्यापूर्वी कांदा पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत झाली. अलीकडे जास्तीचे उत्पादन घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर केला जात आहे.
मात्र, रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होत असून, तो टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खत, जैविक व इतर खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर केला पाहिजे.
शेतीकडे जुगार म्हणून न पाहता नव तंत्रज्ञान वापरून सूक्ष्म अतीसूक्ष्म निरीक्षण, कष्ट करायची तयारी ठेवून एक व्यवसाय म्हणून केल्यास निश्चितच उत्तम अर्थार्जन लाभते असे ऋषिकेश नरेंद्र तांबे यांनी सांगितले.
यावेळी तांबे यांनी सांगितले की ऊस लागवडीसाठी कांदा पीक निघाल्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये जमिनीची ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली. नंतर एकरी ४ ट्रेलर शेणखत टाकले व जमिनीला ट्रॅक्टरची फणनी फिरवून मशागत केली. नंतर ४.७५ फूट या अंतरावर सरी सोडली.
२६ व २७ जून २०२३ रोजी ४.७५ बाय १.५ फूट या अंतरावर को.८६०३२ या वाणाची रोप लागवड केली तण व्यवस्थापन लागवडी नंतर २१ दिवसांनी रासायनिक तणनाशक वापरले तसेच वेळोवेळी खुरपणी केली.
सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांद्वारे उसाला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केले. लागवडीनंतर १० दिवसांनी बी व्हि एम व स्फुरद विरघळवणारे जिवाणू प्रति एकर ३ लिटर पाट पाण्याद्वारे वापरले. लागवडीनंतर १ महिन्याने नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांचा रासायनिक खतांच्या माध्यमातून वापर केला.
लागवडीनंतर ५५ दिवसांनी प्राथमिक अन्नद्रव्ये व सल्फरचा वापर केला व उसाला बाळ भर लावली. अंदाजे २.५ महिन्यांनी सिलिकॉन व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर केला. १०५ दिवसांनी प्राथमिक अन्नद्रव्यांचा वापर करून पॉवर टिलरद्वारे उसाची बाळ बांधणी केली.
१४५ दिवसांनी प्राथमिक व दुय्यम खतांचा वापर केला व पॉवर टिलरद्वारे उसाची मोठी बांधणी केली. प्रत्येक वेळी रासायनिक खतांचा वापर ती माती आड करूनच केला. सरी चढवल्या नंतर वेळोवेळी विद्राव्य खतांचा पाट पाण्याद्वारे वापर केला.
६ व ११ महिन्यांनी जैविक खतांचा पाट पाण्याद्वारे वापर केला. खते थोडी थोडी परंतु अधिक हप्त्यांमध्ये विभागून दिली. संपूर्ण हंगामात उसाला प्रति एकरी २५० किलो : १२५ किलो : १५० किलो नत्र : स्फुरद : पालाश वापरले.
रोग व कीड व्यवस्थापन वेळोवेळी पोक्का बोईंग, लष्करी अळी, हुमणी, चाफर बिटल यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा, बुरशीनाशक वापर केला. तसेच संजीवक व सह संजीवकांच्या पहिल्या ५ महिन्यांपर्यंत फवारण्या केल्या त्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले.
विक्रमी उत्पादन घेताना राजेंद्र अहिनवे तसेच विघ्नहर कारखान्याचे ऊस विकास विभागाचे अंतर्गत पांडुरंग मुंढे, प्रकाश पानसरे, नरेंद्र पाटील डुंबरे, सागर नायकोडी, संतोष भोर व संदीप मोरडे यांचे मार्गदर्शन लाभले.
अधिक वाचा: संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर