Sugarcane Success story :
शेतीचे योग्य नियोजन व जिद्द, चिकाटीच्या जोरावर अपार मेहनत केल्यावर उत्पादनसुद्धा भरभरून मिळते. याचे उदाहरण म्हणजे सिंधी येथील गोविंद धोंडजी कवळे. त्यांना यंदा ४० गुंठे ऊसाच्या शेतातून ८२ मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन आले.
उमरी तालुक्यातील सिंधी येथील गोविंद धोंडजी कवळे या प्रयोगशील शेतकऱ्याने किमया करून दाखविली असून एकरी ८२ मेट्रिक टन उसाचे उत्पादन काढून एका एकरला दोन लाख पाच हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा विक्रम करून दाखवला आहे.
शेतीमध्ये काहीच होत नाही. उत्पादन मिळत नाही. आता शेती परवडत नाही, असा सातत्याने नकारात्मक व नैराश्याचा सूर काढणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कवळे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहेत.
अशी केली लागवड
कवळे यांनी एकर क्षेत्रात को. २९३, ८००५ या बेण्याची २० ऑगस्ट २३ रोजी लागवड केली. सरीतील अंतर साडेचार फूट व बेण्यात अंतर एक फूट ठेवून लागवड केली. आडसाली ऊस लागवडीपूर्वी पूर्व मशागत करून सरी पाडून बेसल डोसची खते टाकली व नंतर लागवड केली. यंदा उर्ध्व पैनगंगेच्या कॅनलमधून पाण्याची सोय करून योग्य नियोजन केले. त्यामुळे ४० गुठ्यांत ८२ मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेण्याची किमया त्यांना साध्य करता आली. लागवडीसाठी उसाचे बेणे सिंधी येथील गूळ पावडर कारखान्याने दिले होते.
मागील वर्षी त्यांनी १४ एकर उसाची लागवड केली होती. त्यातून ६५० मेट्रिक टन ऊस झाला तर यंदा १८ एकर आडसालीप्रमाणे लागवड केली. एक मेट्रिक टनास मागील वर्षी २ हजार ५०० रुपये भाव मिळाला होता. कोरडभाव उत्पादनात खर्च वजा जाऊन काहीच पदरात पडले नव्हते.
येथे घेतले प्रशिक्षण
कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे यांनी नियोजन मला प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. पुणे येथे व्हीएसआय (वसंतराव दादा शुगर इन्स्टीट्युट) येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन गावी आल्यावर उसाचे पीक घेण्याचे निश्चत केले. या प्रशिक्षणात रान तयार करण्यापासून ते ऊस तोडणीपर्यंतच्या सर्व गोष्टींचे विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचा ऊस उत्पादन घेताना फायदा झाला.
आगामी काळातही एकरी शंभर टन ऊस नक्कीच निघणार असल्याची माहिती कवळे यांनी दिली. उद्योग विकास अधिकारी एस.के. सावंत, कृषी सहायक कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आडसाली ऊस लागवड करून शेतकरी गोविंदराव कवळे यांनी हा प्रयोग यशस्वी केला.
शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम
शेती व्यवसायातसुद्धा असे उच्चांकी उत्पादन घेता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखवले. अनेक शेतकऱ्यांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला आहे. प्रगतीशील शेतकरी गोविंद कवळे व ऊस विकास अधिकारी साईनाथ सावंत यांच्या यशाचे कौतुक होत आहे. कवळे यांच्या उसाची तोड पूर्ण झाली असून आता खोडव्याचे नियोजन सुरू होणार आहे.
खताची मात्रा देणे, भर लावणे आणि ठिबक सिंचन संच बसवणेसाठी असे पुढील नियोजन करण्यात आले आहे. या शेतकऱ्याने आपल्या शेतात उसाचे उत्पादन घेतले. सिंचन, खत, योग्य ऊस जातीची लागवड केली.
उसाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खुप कष्ट घेऊन त्यांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दाखविली. व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे, ऊस विकास अधिकारी साईनाथ सावंत यांचे गोविंदरावांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
मेहनतीचे फळ
सातत्यपूर्ण मेहनत करून खत, फवारणी, आळवणीचे व्यवस्थापन केल्याने गोविंदराव कवळे यांच्या मेहनतीला फळ आले. उसाला तोडणीच्या वेळी प्रति ४५ ते ४७ कांडी उंच ऊस मिळाला व आज केवळ ४० गुंठ्यांत ८२ मेट्रिक टनांचे उत्पत्र मिळाले. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी ऊस पिकाची लागवड करावी. - गोविंदराव पाटील कवळे, शेतकरी