सतीश गावडे
पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आज आमच्या मेहनतीचे चीज झाले असून खा. शरद पवार यांनी केलेले कौतुक आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देते. त्यांच्या भेटीने मनोबल उंचावले. जगताप यांचे हे यश पाहून त्यांच्या सारखे हजारो शेतकरी निर्माण झाले पाहिजे. त्यांनी मिळवलेले यश शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांनी विविध प्रकारे शेती केली पाहिजे, देशाला अशा शेतकऱ्यांची नितांत गरज आहे.
शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या अनेक शेतकऱ्यांपुढे पणदरे येथील शेतकऱ्याने आदर्श निर्माण केला आहे. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची व कल्पकतेची जोड देऊन जिद्द-चिकाटी व मेहनतीच्या जोरावर केवळ १ एकर शेतीमधून उच्चांकी १३८ टन विक्रमी ऊस उत्पादन घेण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. अॅड, संजय यशवंत जगताप असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या उच्चांकाची माहिती मिळताच माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी ऊस शिवाराला भेट देऊन जगताप कुटुंबीयांचे कौतुक केले.
माळेगाव कारखान्याचे सभासद असलेले अॅड. संजय जगताप यांची पणदरे भागातील सोनकसवाडी येथे शेती आहे. त्या शेतात त्यांनी उच्चांकी ऊस उत्पादनाची किमया साधली आहे. त्यांनी शेतातील पूर्वीची केळीचे बाग मोडली. यानंतर त्यांनी को ८६०३२ जातीच्या ऊस रोपांची निवड केली. ७ फुटी पट्टा काढून तब्बल ४२०० गन्ना मास्टर ऊस रोपांची आडसाली लागण केली. प्रत्येक रोपात सुमारे दीड फूट इतके अंतर ठेवले. हि रोपे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथुन आणली होती. ऊस रोपांची उगवण झाल्यानंतर दर्जेदार खते वापरली.
अधिक वाचा: कोपरगावचा संजीवनी कारखाना बनवतोय 'शुगर फ्री' साखर
त्यांची बांधणी व तगारणी झाल्यावर रासायनिक खते, ठिंबक सिंचनाचा वापर करून पाणी व खते दिली. तसेच रोपांना योग्य सुर्यप्रकाश व खेळती हवा मिळाल्याने ऊसाच्या कांड्यांची वाढ चांगली झाली, कांडे १० ते १२ व २० ते २२ वर आल्यावर दोनदा उसाचे पाचट काढले. परिणामी ४५-५० कांड्यापर्यंत ऊस तयार झाला, उत्पादन घेताना माळेगाव कारखान्याचे ऊस विकास अधिकारी काळे यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरले.
४५-५० कांड्यांपर्यंत ऊस
ऊस रोपे लावल्यानंतर त्यांची उगवणी झाल्यावर दर्जेदार खते वापरली. त्यांची तगारणी झाल्यावर रासायनिक खते, ठिबक सिंचनाचा वापर करून पाणी व खते दिली. तसेच, रोपांना योग्य सूर्यप्रकारा व खेळती हवा मिळाल्याने उसाच्या कांड्यांची वाढ चांगली झाली. काड १० ते १२ व २० ते २२ कांड्यांवर आल्यावर दोनदा उसाचे पाचट काढले. परिणामी, ४५-५० कांड्यांपर्यंत परिपक्व ऊस तयार झाला.
यशस्वी प्रयोगामुळे प्रशस्तीपत्र, सत्कार
अॅड. संजय जगताप हे पुण्यात वकिली करतात, त्यांची दोन मुले धीरज व तेजस यांना शेतीची आवड असल्याने सर्वाच्या कष्टाच्या जोरावर हे यश मिळाले आहे, असे अॅड. संजय जगताप सांगतात. इच्छाशक्तीच्या जोरावर अॅड. संजय जगताप व त्यांचे कुटुंबीय यांनी ऊस उत्पादनात माळेगाव कार्यक्षेत्रात इतिहास घडवला. त्यांनी यशस्वी केलेल्या प्रयोगामुळे त्यांचे माळेगाव कारखान्याच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या बद्दल त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव करण्यात येत आहे.
पारंपरिक शेती करण्याऐवजी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आमच्या कष्टाचे चीज झाले असून खा. शरद पवार यांनी केलेले कौतुक आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देते त्यांच्या भेटीने मनोबल उंचावले. - अॅड. संजय जगताप, शेतकरी