दिलीप मोहिते
विटा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त खानापूर गावातील महिलाशेतकरी सौ. सरलाताई दत्तात्रय शेटे यांनी कमी पाण्यावर दोन एकरवर पिंक तैवान या जातीच्या पेरू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला. ओसाड अन् उजाड माळरान फुलवले. 'शेती विकायची नसते तर पिकवायची असते', असा संदेश त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
खानापूर तालुक्यातील लेंगरे हे माहेर असलेल्या सरलाताईंचे खानापूर हे सासर. वडील दिवंगत दादासाहेब ठिगळे हे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी होते. माहेरी एक भाऊ प्राध्यापक व दुसरा भाऊ बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक आणि बहीण मुख्याध्यापिका आहे. माहेरी शैक्षणिक वातावरण असताना कोणतीही पदवी न घेता जेमतेम १० वी शिकलेल्या सरलाताईनी आई सुशीलाबाई यांचे शेतीतील कष्ट जवळून पाहिले होते.
सासरी खानापूर येथे उद्योग, व्यवसायाचे वातावरण असतानाही त्यांनी पती दत्तात्रय शेटे यांना शेती व्यवसायाकडे वळविले. दोन्ही मुलांना अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण देऊन अभियंता केले. खानापूरच्या उत्तरेस शेडगेवाडी परिसरात त्यांच्या मालकीच्या दोन एकर क्षेत्रात सरलाताईंनी पिंक तैवान या पेरूची १ हजार ४०० झाडे लावून ठिबकने पाणी दिले, पाण्याचे अत्यंत चांगले नियोजन करून ओसाड माळरानावर पेरूची बाग फूलविली आहे.
अधिक वाचा: कुंडलच्या शेतकऱ्यांकडून उच्चांकी १३१ टन उसाचे उत्पादन
उसाला फाटा देऊन फळपिकांना प्राधान्य
सध्या खानापूर तालुक्यात टेंभूचे पाणी आले असल्याने अनेक शेतकरी ऊस पिकाकडे वळले. परंतु, जिगरबाज महिला शेतकरी सरलाताई शेटे यांनी यापासून दूर राहत फळ पिकांवर लक्ष केंद्रित करून पेरू बागेचा प्रयोग यशस्वी केला आहे. सरलाताई यांच्या या यशस्वी प्रयोगाची खानापूर तालुक्यात चर्चा आहे.
७०० ग्रॅमचे पेरू
एका पेरूचे वजन किमान ६०० ते ७०० ग्रॅम असून किलोला सध्या ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे. हा दर ५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून या दराने विकला गेला तर एकरी सुमारे ५ ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.एका पेरूचे वजन किमान ६०० ते ७०० ग्रॅम असून किलोला सध्या ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे. हा दर ५० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असून या दराने विकला गेला तर एकरी सुमारे ५ ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल.
शेती विकायची नसते तर पिकवायची असते, ही माझ्या वडिलांची शिकवण होती. त्यांची प्रेरणा घेऊन मी पहिल्यांदाच पेरू लागवडीचा केलेला प्रयोग यशस्वी झाला. शेतीला २४ तास वीज व पाणी मिळाले तर शेतकरी समृद्ध होईल. - सरलाताई शेटे, खानापूर
वडिलांचा वारसा फक्त त्यांच्या मुलांनीच चालवायचा असतो असे नाही, तर, मुलीसुद्धा आपल्या वडिलांचा वारसा खंबीरपणे चालवू शकतात, हे माझी बहीण सरलाताईने सिद्ध करून दाखविले आहे. त्यांचा कृषी पर्यटनाचा मानस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. शेतकऱ्यांनी फळबागाकडे वळावे. - प्रा. संजय ठिगळे, कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक