- दत्ता लवांडे
पुणे : रोजगाराच्या शोधात मराठवाडा, विदर्भातील अनेक तरूण पुण्या-मुंबईसारख्या शहरात येतात पण अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटत नाही. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मराठवाड्यातील चार तरूणांनी शेतीचा आसरा घेत पुण्यातच एक व्यवसाय सुरू केला आहे. आपल्या शेतात पिकणारा हुरडा पुण्यासारख्या शहरात विक्री करून चांगला नफा हे तरूण कमावत आहेत.
हाताला काहीतरी काम मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एका खेड्यातील अमित मरकड पुण्यात आला. पण अपेक्षित असं काम मिळत नव्हतं त्यामुळे तो नाराज होता. नव्या नोकरीच्या शोधात असताना आपण शेतकरी आहोत आणि शेतीच्या उत्पादनापासून काहीतरी व्यवसाय सुरू केला पाहिजे असं त्याच्या लक्षात आलं आणि शेतात पिकवलेला हुरडा विक्री करण्याचं ठरवलं. गावाकडून हुरडा बनवून आणायचा आणि पुण्यात मित्र मंडळी किंवा ओळखीच्या लोकांना तो विकू लागला.
नोकरी मिळेना! कांदा व्यापारातून शेतकरीपुत्र कमावतोय वर्षाकाठी २० लाख
सोशल मीडियावर पोस्ट टाकत गेल्याने ग्राहक वाढू लागले. एवढ्या ग्राहकांना सांभाळणे अमितला एकट्याला शक्य नसल्याने त्याने ऋषिकेश नवले, श्रीकृष्ण थेटे आणि राहुल जाधव या आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन काम सुरू केलं. आता ते पुण्यात भरणाऱ्या फेस्टिवल, प्रदर्शनामध्ये स्टॉल लावून ते हुरडा विक्री करतात. त्याचबरोबर दररोज ५० किलोंपेक्षा जास्त हुरडा विक्री पुण्यात ऑनलाईन पद्धतीने केली जाते. त्यांच्या या प्रयोगामुळे गावाला असलेल्या शेतकऱ्यांच्या हातालाही काम मिळालं आणि त्यातून त्यांनाही चांगलं अर्थार्जन होत आहे.
मराठवाडा हुरडा कंपनीची स्थापनाआपण मराठवाड्यातील आहोत आणि आपल्याच मळ्यातील माल आपण विक्री करत आहोत म्हणून आपल्या लोकल मालाला ग्लोबल ओळख असावी या हेतूने अमितने त्यांच्या व्यवसायाला 'मराठवाडा हुरडा कंपनी' असं नाव दिलं. या छताखाली ते मराठवाड्यातील स्पेशल गूळभेंडी वाणाचा हुरडा आणि केशर, हापूस आंब्याची विक्री करत आहेत. या व्यवसायातील चारही मित्र मूळ शेतकरी असून त्यातील एक कोकणातील हापूस आंब्याचा शेतकरी आहे.
अबिदअली काझी यांनी नोकरीच्या मागे न धावता फळशेतीला दिली पसंती
मार्केटिंग साठी सोशल मीडियाचा वापरअमित पुण्यामध्ये हुरडा विक्री करण्यासाठी व्हाट्सअपचा आणि सोशल मीडिया जसे की फेसबुक, इंस्टाग्रामचा वापर करतो. ग्रुपच्या माध्यमातून हुरड्याच्या ऑर्डर घेतल्या जातात आणि एका खासगी डिलीव्हरी कंपनीद्वारे संपूर्ण पुण्यात ग्राहकांना घरपोहच दिली जाते. त्याचबरोबर हुरडा खराब असेल किंवा त्याचा वास येत असेल तर तब्बल १० वेळा बदलून देण्याची हमीसुद्धा ते देतात त्यामुळे ग्राहकांचा विश्वास त्यांनी कमावला आहे. हापूस आंब्याची विक्रीसुद्धा ते अशाच पद्धतीने करतात.
विना सहकार नाही उद्धार! सहकारातून समृद्धीचा मार्ग दाखवणारे सहकार आयुक्त
तीन महिन्याला सहा लाखांचा नफाहुरड्याचा सीझन हा फक्त नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीमध्येच असतो. त्यामुळे या तीन महिन्यात हा व्यवसाय चालतो. प्रदर्शन, महोत्सवामध्ये स्टॉल लावून झालेली विक्री आणि दररोज होणारी होम डिलीव्हरी यातून तीन महिन्यामध्ये साधारण सहा लाखांचा निव्वळ नफा अमित कमावतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आंब्याची विक्री करून कमावलेला नफा वेगळा असतो.
मी सध्या एका प्रकाशनामध्ये नोकरी करतोय पण मला त्यामध्ये पुरेशे पैसे मिळत नसल्यामुळे काहीतरी व्यवसाय सुरू करायचं डोक्यात होतं. म्हणून मी आपल्या घरीच पिकणारा हुरडा निवडला आणि त्याची ऑनलाईन विक्री पुण्यात सुरू केली. जेवढा लागेल तेवढा हुरडा मला गावाकडून मागवून घ्यावा लागतो. व्हाट्सअपच्या माध्यमातून ऑर्डर घेऊन मी ऑनलाईन पद्धतीने विक्री करतो. जॉबमधून कमी पैसे मिळत असल्याची कसर या व्यवसायाने भरून काढली आहे.- अमित मरकड (युवा उद्योजक)