- रविंद्र शिऊरकर
घरच्या शेतीची गरज भागावी यासाठी उभारलेला गांडूळ खताच्या एका युनिटमधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाप-लेकाने लाखोंची उलाढाल केली आहे.मुलाच्या मदतीने या गांडूळ खताच्या व्यवसायाचा विस्तार वाढत गेला आणि आज शेकडो टन गांडूळ खत उत्पादन व विक्री हा त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील माळीवाडगावचे शेतकरी गोरखनाथ गोरे यांना शेतात विविध प्रयोग करण्याचा छंद. डाळिंब व विविध फळपिके त्यांनी घेतली. मात्र, सततच्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची झीज होऊ लागल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.आपल्या जमिनीची सुपीकता वाढवावी म्हणून त्यांनी प्रगतशील शेतकरी व कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधला.त्यांच्याकडून गांडूळ खताची माहिती घेतली आणि आपल्याकडील बांबू, पालापाचोळा वापरत शेतातील झाडाखाली गांडूळ खत निर्मिती सुरु केली व त्यातून तयार झालेले खत गोरे यांनी आपल्या शेतात वापरले.
अल्पावधीत पिकांत लक्षणीय बदल दिसून आले. मग हळुहळु परिसरातील शेतकरीही गांडूळ खताची मागणी करू लागले. यातून सुरुवात झाली ती भुरत्न गांडूळ खत युनिटची.गांडूळ खत, व्हर्मी वॉश, टेट्रा व्हर्मी बेड, शेवगा बीज (शेंग व पाल्यासाठी) आदींची उत्पादने असलेल्या या भुरत्न युनिटची सूत्रे सध्या बी.एस्ससी ऍग्रीचे शिक्षण पूर्ण केलेला गोरखनाथ गोरे यांचा चिरंजीव मंगेश यशस्वीरित्या सांभाळत आहे. टेट्रा बेड विक्रीसोबत त्याची निर्मिती देखील तो करतो आहे. यासह गांडूळ खतामध्ये नवनवीन प्रयोग कारण्यासोबत वार्षिक जवळपास २५० टन गांडूळ खताची मंगेश विक्री करतो. सेंद्रिय शेती करतांना वेळोवेळी लागणारे योग्य मार्गदर्शन देखील मंगेश परिसरातील शेतकऱ्यांना देत आहे.
शेवगा शेती व मूल्यवर्धन
गोरखनाथ यांनी आपल्या ४ एकर क्षेत्रात शेवगा लागवड केली आहे. त्याची सुरुवातीला ते पारंपरिक पद्धतीने शेंगा विक्री करायचे. मात्र, त्यातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी त्या जागी संशोधित शेवगा लागवड करत त्यातून बीज विक्री करत शेवगा मूल्यवर्धन वाढवले आहे. ज्यामध्ये ओ डी सी प्लस या जातीच्या शेवग्याची लागवड केली आहे. ज्याद्वारे या बीजांची विक्री केली जाते. तसेच पी के एम १ / २ या जातीच्या शेवग्याची देखील लागवड त्यांनी केली असून या बीजांच्या पाल्यासाठी शेवगा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्री केली जाते.
अत्याधुनिक गांडूळ खत युनिट
गांडूळ खताची वाढलेली मागणी लक्षात घेता ४६ फूट बाय ८० फूट आकाराचा पक्के बांधकाम असलेला शेड २०१६ मध्ये गोरे यांनी उभारला असून यामध्ये गांडूळ खत निमिर्तीसाठी ३० फूट × ४ फूट × १ फूट आकाराचे ९ हौद केले असून त्याद्वारे गांडूळ खत तयार केले जाते. नंतर चाळणी यंत्राद्वारे चाळून एकसारख्या खताची विक्री केली होते.
विक्री योग्य उत्पादने व त्यांची मूल्ये
गांडूळ बिज २५० रुपये किलो, गांडूळ खत १० - २० रुपये किलो (मागणी नुसार), व्हर्मी वॉश - ८० रुपये लिटर, टेट्रा व्हर्मी बेड - १५०० रुपये प्रति बेड (१२ फूट लांब, ४ फूट रुंद, २ फूट उंच).