मोसंबीच्या बागेमध्ये पपईचे आंतरपीक घेऊन येथील शेतकऱ्याने अभिनव प्रयोग केला आहे. या पीक पद्धतीतून केवळ महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. या पीक प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे.
हळदा येथील शिवकुमार पुष्पुलवार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांनी मोसंबीच्या - साडेतीनशे रोपांची लागवड केली होती.
मोसंबी पिकाला पाच वर्षांनंतर फळधारणा होते. त्यामुळे मोसंबीमध्ये आंतरपीक घेण्याचा निर्णय शिवकुमार पुष्पुलवार यांनी घेतला. फेब्रुवारी २०२३ मध्ये ६ बाय ८ फूट अंतराने दीड एकरमध्ये पपईच्या अकराशे रोपांची लागवड केली. माळरानावर कमी पाण्यात कमी खर्चात त्यांनी ही शेती केली. विशेष म्हणजे कोणतेही रासायनिक खत, बायो खताचा वापर त्यांनी केला नाही. त्यांना पपईचे भरघोस उत्पन्न मिळत आहे.
मुंबई, दिल्लीची बाजारपेठ
दोन महिन्यांपासून त्यांनी चाळीस टन पपई दिल्ली, मुंबई, नागपूर या ठिकाणी थेट मार्केटमध्ये विक्री केली. यात त्यांना पाच लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एक पपई तीन ते चार किलो वजनाची भरत आहे.