Pune : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू येथील नैसर्गिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी गुलाब घुले यांच्या शेतातील शेवग्याच्या झाडाला तब्बल ४ फुटांपैक्षा जास्त उंचीची शेवगा शेंग लगडली आहे. हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरला असून दोन वर्षापूर्वी याच झाडाला साडेचार फूट तीन इंच लांबीची शेवगा शेंग आली होती.
भोर तालुक्यातील वेळू येथे गुलाबराव घुले हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात. त्यांनी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग केले असून जिवामृत वापराचे अनेक प्रयोग त्यांनी आत्तापर्यंत आपल्या शेतावर केलेले आहेत. दरम्यान, शेवग्याच्या झाडाला किती जिवामृत द्यावे या प्रश्नावर त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून त्यांना एका झाडाच्या शेंगाची लांबी वाढत असल्याचं लक्षात आलं.
दरम्यान, त्यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या एका झाडाला त्यांनी जिवामृताची मात्रा वाढवल्यानंतर शेंगाची लांबी वाढली. इतर झाडांच्या शेंगाची लांबी मात्र तेवढीच राहिली. यासोबतच काही दिवसानंर त्यांनी आपल्या एका झाडावर पुन्हा जिवामृताचा प्रयोग केला आणि त्याही झाडाच्या शेंगाची लांबी वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
गिनीज बुकमध्ये नोंद
दोन वर्षांपूर्वी त्यांच्या एका झाडावरील शेवग्याच्या शेंगीची लांबी ही साडेचार फूट तीन इंच एवढी झाली होती. याची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. यानंतर गुलाब घुले यांच्याकडे शेंग बघण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची रांग लागली. यावर्षीसुद्धा याच झाडाला चार फुटापेक्षा जास्त लांबीच्या शेंगा आल्या आहेत.
जिवामृताच्या वापरामुळे पीक उत्पादनात तर वाढ होतेच पण त्यासोबतच शेतमालाची गुणवत्ताही वाढल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात नैसर्गिक शेतीकडे वळावे आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.