रविंद्र शिऊरकर उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी मिळत नसल्याने घरच्या शेतीत काहीतरी करू या उद्देशाने मेहनत आणि अनुभवाच्या जोरावर सुरु केलेल्या शेळीपालनाच्या जोड धंद्यातून चित्तेपिंपळगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर येथील तरुण करतोय लाखोंची उलाढाल.
विशाल संतोष दहीहांडे यांची चित्तेपिंपळगाव शिवारात १० एकर शेती मोसंबी, कपाशी, सोयाबीन, मका असा बागायती पट्टा. शिक्षण पूर्ण झाल्यावर विशाल यांनी विविध ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र नोकरी मिळत नसल्याने शेतीत काही तरी करू या उद्देशाने त्यांनी विविध माहिती गोळा करायला सुरुवात केली. त्यातचं शेळीपालनाची माहिती मिळाली.
पुढे २०२० मध्ये राजस्थान येथून शिरोही, सोजत आणि कोटा जातीच्या ४० शेळ्यांची खरेदी केली. ७० फूट लांब ४० फूट रुंद असा एक शेड या शेळ्यांकरिता उभारला. मात्र या प्रयन्त काहिसा अपयशी झाला. पी पी आर रोगाची साथ आली आणि काही कळायच्या आत अनेक शेळ्या मृत झाल्या. उर्वरित शेळ्या जगतील की नाही या भितीने सर्व शेळ्या विकल्या.
हार मानायची नाही पुन्हा उभं राहू या धाडसाने २०२२ मध्ये फलटण वरून आफ्रिकन बोअर जातीच्या शेळ्या व बोकडं आणले. शेड मध्ये दोन्ही बाजूला मोकळी जागा वाढवत त्यांना वावरता येईल अशी मोकळे जागा निर्माण केली. यावेळेस स्वतःचे पूर्णपणे लक्ष देत व्यवस्थापन, वेळोवेळी लसीकरण करतं योग्य नियोजन राखल्याने आता विशाल यांना यातून चांगला नफा मिळत आहे.
शेळ्यांचे दैनंदिन व्यवस्थापनदररोज सकाळी ६ वाजता शेडची स्वच्छता केली जाते. त्यानंतर मका, गहू, खनिज मिश्रण, मिठ आदींचा खुराक वय व वजनानुसार विभागून दिला जातो. पुढे तुर सोयाबीन भुसाची सुकी वैरण टाकली जाते. दिवसांतून तीनदा शेड मधील कप्यातील पिण्याचे पाणी बदलले जाते. दुपारी उपलब्ध चाऱ्याची कुट्टी करून हिरवी वैरण व रात्री मुरघास सोबत मेथी घास किंवा दशरथ घास यांची वैरण दिली जाते. शेळ्यांचे एका वेतातील दोन ते अडीच महिने दूध केवळ करडांना पाजले जाते. ज्यामुळे अडीच महिन्यात सरासरी २० किलोच्या पुढे करडांची वजनवाढ मिळते.
शेळ्यांसाठी असलेले चारा व्यवस्थापनशेळ्यांच्या चाऱ्याकरिता दहीहांडे यांनी नेपियर १० गुंठे, मेथी घास १५ गुंठे, दशरथ घास १५ गुंठे व एक एकर तुती ची लागवड केली आहे. या व्यतिरिक्त तुर व सोयाबीन भुसा विकत घेतला जातो. तर मुरघासासाठी घरच्या शेतातील एक ते दोन एकर हिरव्या मकाचा वापर होतो.
लसीकरण व रोगनिदान दहीहांडे शेळ्यांना तीन वर्षातून एकदा पी पी आर, दरवर्षी हिवाळ्या पूर्वी एफ एम डी, ई टी सोबत टिटी वार्षिक एकदा असे लसीकरण करतात ज्यात ई टी, टी टी चा बुस्टर डोस असतो. उर्वरित ताप, थंडी, पोटफुगी याकरिता गावठी उपाय सोबत स्थानिक पशुवैद्यकीय कर्मचारी यांच्या मदतीने उपचार करतात.
ब्रिडिंग करिता मागणी अधिकआफ्रिकन बोअर या जातीच्या बोकडाना मांस अधिक असते. वजन चांगले असते. ज्यामुळे अलीकडे यांची मागणी देखील वाढली आहे. मात्र मटण बाजारात विक्री करतांना बाजारदर योग्य मिळत नसल्याने ब्रिडिंग मार्केट सध्या चांगले असल्याचे व ब्रिडिंग करिता मागणी देखील अधिक असल्याचे विशाल सांगतात. सध्या आठ महिने ते एक वर्ष कालावधीचा ब्रिडर बोकडं जवळपास दोन लाख ते अडीच लाख रुपयांना विकला जातो.
शेळी बोकड विक्रीतुन मिळणारे उत्पन्नतीन महिने वयाची २० किलोच्या पुढील शेळी १५०० रुपये किलो तर २० किलोच्या पुढील बोकडं १००० किलो या प्रमाणे विक्री होते. याशिवाय उच्च गुणवत्ता असले ब्रिडर विक्री केली जाते. स्वतःहा लक्ष देत असून फक्त एक मजूर सोबतीला असतो ज्यामुळे व्यवस्थापन खर्च कमी आहे. सध्या विशाल दहीहहांडे यांना या आफ्रिकन बोअर शेळीपालनातून वर्षाकाठी खर्च वजा जाता ६ ते ७ लाखांचे उत्पन्न मिळत असल्याचे ते सांगतात.