Join us

आधी करायच्या शेती, आता झाल्या पोल्ट्री फार्मच्या मालकीण!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 5:00 PM

चूल आणि मूल ही परंपरा मोडीत काढत शेतकऱ्याच्या लेकीने नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावत रोवला पोल्ट्री उद्योगात आपल्या यशाचा ठसा. त्याची ही कहाणी जाणून घेऊ या.

- रविंद्र शिऊरकर 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सौ. तारा गौतम मतसागर या वस्ती शाळेवरील शिक्षक असलेले गौतम यांच्याशी विवाहबद्ध होऊन जरुळ तालुका वैजापूर येथे सासरी आल्या. इकडे अवघी दोन एकर कोरडवाहू शेती. आपल्या पतीला कमी पगार त्यात कमी शेती अशा परिस्थितीत उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत त्या होत्या. त्यामुळे कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी सुरूवातीला एकदोन वर्षे शेती केली.दरम्यान, कन्या प्रांजलीचा जन्म झाला आणि त्याचबरोबर २००३ मध्ये नाशिक जिल्ह्यातील नातेवाईकांच्या गोतावळ्यातून कुक्कुटपालनाची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी कुक्कुटपालन सुरू करण्याचे ठरवले. आपल्याकडील अल्पशा आर्थिक बचतीचा वापर करत बांबू आणि चाऱ्यापासून छोटंसं शेड उभारून त्यांनी त्यात पोल्ट्री सुरू केली. इथंच ‘प्रांजली पोल्ट्री फार्म’ चा जन्म झाला. त्याद्वारे व्यक्तिगत स्तरावर बॉयलर पक्षांचे संगोपन त्यांनी सुरू केले. मात्र  दुसऱ्याच वर्षी बर्ड फ्ल्यू मुळे सर्व पक्षी गेले. तरीही खचून न जाता येणारे अनुभव त्यातून मिळणारी शिकवण यातून दिवसेंदिवस सुधारणा करत, सोबत २००५-०६ मध्ये बँकेतून घेतलेल्या अवघ्या तीस हजार रुपयांच्या कर्जावर यशस्वी वाटचाल त्यांनी केली. आज सौ तारा गौतम मतसागर यांच्या दोन एकर क्षेत्रात ३० फूट × २८० फूट अंतराचे तीन पोल्ट्री शेड असून कुक्कुटपालनाच्या उत्पन्नावर घर आणि मुलगी प्रांजली व मुलगा सिद्धेश यांचे शिक्षण सुरु असल्याचे त्या सांगतात. 

पोल्ट्री फार्मचे व्यवस्थापन  तीन शेड मधून काही प्रमाणात मजुरांची मदत घेत वार्षिक ५-६ बॅच घेतल्या जातात. यासाठी खाजगी अंडी उबणूक केंद्रातून (हॅचरी) एक दिवसाची पिल्ले विकत घेत त्यांचे ३० - ३५ दिवस संगोपन केले जाते. ज्यात ७ - १४ - २१ व्या दिवशी विविध प्रतिबंधक लसींचे लसीकरण केले जाते. तसेच त्यांना स्वच्छ पाणी आणि परिपूर्ण खाद्य दिले जाते. एक बॅच निघाली की त्या शेडला पूर्णपणे निर्जंतुक केले जाते. तोवर दुसऱ्या शेड मध्ये पुढील बॅचचे नियोजन सुरु होते. 

पोल्ट्री खाद्य मिलची उभारणी मतसागर हे परिसरातील शेतकऱ्यांकडून दोन हंगामात वर्षभराची मका खरेदी करून ठेवतात. तसेच धुळे जिल्ह्यातुन सोयाबीन डी ओ सी खरेदी करतात. यात खासगी कंपनीद्वारे घेतलेले खनिज घटक युक्त खाद्य मिळवत आपल्या मिलद्वारे पिल्लांना प्री स्टार्टर, स्टार्टर, फिनिशर असे पोषक खाद्य पुरवतात. 

डावीकडून सौ तारा मतसगार चिरंजीव सिद्धेश व कन्या प्रांजली मतसागर

एका बॅचचा खर्च व उत्पन्न सौ ताराताई २०-३० रुपयांपर्यंत एक दिवसीय पक्षी विकत घेतात.  त्यांचे ४०-४५ दिवसांत २५०० ते २८०० ग्रॅम वजन मिळवतात. या पक्षांची बाजारभावानुसार जागेवर विक्री केली जाते. यात १०% पर्यंत मरतुक देखील होते. बाजारभावानुसार पिल्लांची खरेदी, खाद्य, देखभाल मजुरी, लसीकरण, आदी सर्व खर्च वगळता एका पक्षामागे ५ ते ७ रुपये निव्वळ नफा राहतो. एका बॅचद्वारे ३०-३५ हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे सौ. तारा मतसागर सांगतात. 

कन्या प्रांजलीचाही पोल्ट्रीकडे कलसौ तारा गौतम मतसगार यांची कन्या प्रांजली सध्या बी एससी (ऍग्री) चे शिक्षण घेत आहे. लहानपणापासून कुक्कुटपालनामधील बारकावे बघत असल्याने या व्यवसायातील बऱ्याच अडचणींची तोंड ओळख तिला झाली आहे. त्यामुळे भविष्यात पोल्ट्रीमध्ये आणखी चांगलं काम करायचं असल्याचे प्रांजली सांगते.

टॅग्स :व्यवसायऔरंगाबाद