अधिक उत्पादन, रोगराईच्या प्रादुर्भावात तग धरणारे वाण म्हणून गव्हाच्या नवनवीन जाती घेण्यावर भर दिला जात असताना माळकरंजा येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी पारंपरिक अशा जुन्या 'जोड गव्हाचे' उत्पादन घेत अर्थकारणाला बळ देण्यात आपला हातखंडा निर्माण केला आहे. त्यांचा उत्पादित माल यामुळेच अन्य गव्हाच्या वाणापेक्षा ५० टक्के अधिक दराने हातोहात खपला जात आहे.माळकरंजा येथील बाळासाहेब बापूराव पाटील हे एक प्रयोगशील शेतकरी. त्यांच्या तीस एकर क्षेत्रात प्रत्येक हंगामात तुकड्यातुकड्यात वेगवेगळ्या पिकांची, वाणांची शेती दिसून येईल. प्रयोगशीलता, सर्जनशीलता, व्यावसायिकता या त्रिसूत्रीचा वापर करत असल्याने पाटलांचा उत्पादकता अन् उत्पन्न यात कोणीच हात धरू शकत नाही, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक उमेश पोतदार यांनी दिली.
कोविडच्या पर्वात प्रत्येकाचा आपली 'इम्युनिटी टिकवण्यावर भर होता. यासाठी सकस, पोषक तत्त्वांनी पुरेपूर असलेला आहार घेण्याकडे कल होता. यातूनच बाळासाहेब पाटील यांना हजारो वर्षांच्या कृषी पीक पद्धतीमधील एक घटक असलेल्या गव्हाच्या खपली अर्थात जोड गव्हाची माहिती मिळाली, बार्शीतून याचे बियाणे उपलब्ध केले अन् त्याच्या आपल्या प्रयोगशील शेतीत बीजारोपण केले
पेरले, खाल्ले मग क्षेत्र वाढविले...
पूर्वी लोक नव्वदीतही कणखर होती. त्यांच्या आहारात असलेल्या गव्हाचा वाण म्हणजे जोड खपली गहू. बाळासाहेब पाटलांनी या गव्हाची लागवड केली, उत्पादन केले अन् त्यास आपल्या आहारात स्थान दिले. तो चविष्ट, शक्त्तिवर्धक जाणवला. यानंतर दुसरा गहू आहारात नकोसा वाटला. यामुळेच पुढे क्षेत्र वाढवले, बियाण्यांचा प्रसार केला.जुनं ते सोनं...
तृणधान्यातील गव्हाच्या शरबती, बन्सी, लोकवन, २१८९ अशा अनेक जातीचा प्रसार झालेला असताना खपली, जोड या जुन्या वाणास आजही महत्त्व आहे. बाजारात दुप्पट, तिप्पट भाव मिळतो. मागणीच्या तुलनेत माल नसतो. लालसर दिसणारा हा गोडसर गहू जास्त तंतुमय, आरोग्यवर्धक, बलवर्धक, वातपित्तनाशक, पाचक व पौष्टिक असतो.
प्रचलित लागवड पद्धत, उत्पादनाची हमी
यंदा १ ऑक्टोबरला चार एकर क्षेत्रावर, एकरी २५ किलो बियाण्यांचा वापर करत, दोन ओळीत १८ सेमीचे अंतर सोडत लागवड केली. तुषार संचाने पाण्याच्या चार पाळ्या केल्या. हा गहू योग्य मशागतीने शंभर दिवसांत काढणीला आला, एकरी ११ याप्रमाणे ४६ क्विंटल उत्पादन, ७८ रुपये किलोने सालवटासह जोड गव्हाची थेट सोलापूरला विक्री केली.
आहारात गोडवा, आरोग्यास बळ...
दररोजच्या आहारातील चपाती, परोठाच काय ? अगदी गव्हाची खीर, लापशी, पुरणपोळी, शेवया, कुरवडी या मराठमोळ्या 'मेन्यू'चा अस्सल स्वाद घ्यायचा असेल तर त्यास खपली किंवा जोड गहू उत्तम मानला जातो. तो मधुमेह, कोलन कर्करोग, बद्धकोष्ठता, दात व हाडांची समस्या, ग्लुकोज पातळी यावर गुणकारी ठरतो. यामुळेच स्वादाचा गोडवा देत आरोग्यदायी हा बाणा दाखवणारा जोड, खपली गहू बाजारात भाव खातो.