- पोपटराव मुळीक
लवाडी (ता. इंदापूर) येथील शहाजी धोंडीबा शिंदे यांनी चक्क चंदनाची शेती केली आहे. यामध्ये शिंदे यांनी २०१७ मध्ये चंदनाची लागवड केली तसेच या चंदनाच्या शेतीमध्ये २०१८ मध्ये मिलीया डुबिया व पेरूची आंतरपिके घेतली असल्याने शिंदे यांना ५० गुंठ्यामध्ये चंदनाचे बारा वर्षात तब्बल कोट्यवधी रुपये तर मिलिया डुबिया चे चार वर्षात लाखो रुपये तर पेरूचे प्रतिवर्षी ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
येथील शेतकरी शहाजी शिंदे यांनी आपल्या सव्वा एकर शेतामध्ये फळबागा किंवा उसाचे पीक न घेता अगदी चंदनाची शेती करण्याचा निर्णय घेतला शिंदे यांनी चंदनाची रोपे दापोली येथून खरेदी केली. आपल्या ५० गुंठे क्षेत्रामध्ये ३३० चंदनाच्या झाडांची लागवड केली. परंतु हे चंदनाचे झाड परोपकारी असल्याकारणाने या झाडाच्या शेजारी दूसरे झाड लावण्याची गरज असल्याने शिंदे यांनी या चंदनाच्या झाडाशेजारी अधिक उत्पन्नाचेच म्हणजे मिलिया डुबिया या झाडाची निवड करून २०० झाडांची लागवड केली, तर शिंदे यांनी चंदन तसेच मिलीया डुबिया या झाडांमध्येच पेरूची लागवड केली आहे.
दहा ते बारा किलो गाभा मिळतो
यातील पेरू हे पीक तीन वर्षांपासून हजारो रुपयांचे उत्पादन देत आहे. शिंदे यांच्या चंदनाच्या झाडाला सहा ते साडेसहा वर्ष झाली आहेत. दहा वर्षानंतर चंदनाचे झाड तोडावयास येते. त्यावेळी एका झाडामध्ये दहा ते बारा किलो वजनाचा गाभा मिळतो. चंदन म्हटले की तस्करी आली. यासाठी शिंदे यांनी चंदनाच्या शेतीच्या चारही बाजूने काटेरी कुंपण करून या चारही बाजूने सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच चारही बाजूला हायमास्ट दिवे बसवण्याची व्यवस्था केली आहे.