शेती हा तोट्याचा धंदा आहे, शेतीत काम करणारा कधीच फायद्यात राहत नाही, शेतमालाला कधीच दर नसतो म्हणून शेतीपेक्षा नोकरीकडे वळणारे खूप आहेत. पण नोकरीच्या नादाला न लागता शेतीमध्येच आपलं नशीब आजमावणारे नगण्य लोकं पाहायला मिळतात. त्यातच महिला अन् मुलींचा टक्का तर शून्यच म्हणायला हरकत नाही.
सध्या पुण्यासारख्या शहरातील लाईफस्टाईल सगळ्यांनाच आकर्षित करते. पण शेतात काम करायला मुली नाक मुरडतात. शेतकऱ्यांच्याच पण शेतीत काम न करणाऱ्या मुलींच्या नाकावर टिच्चून पुण्यातीलच केवळ १९ वर्षाची तरूणी नोकरी सोडून शेतात आपलं नशीब आजमावतीये. शेतीतल्या छोटमोठ्या कामापासून शेतमाल विक्री करण्यापर्यंतची सगळी काम ही एकटी करतीये. सिद्धी चौधरी असं तिचं नाव. तरूणांनाही लाजवेल असा तिचा प्रवास. तिचा संघर्ष प्रेरणादायी आहे, दमदार आहे...!
पुण्याजवळ असलेल्या हवेली तालुक्यातील नायगाव येथील सिद्धी रहिवाशी आहे. वडील बाळूमामाच्या सेवेसाठी जातात म्हणून तिने शेतीत लक्ष घालायला सुरूवात केली आणि शेतीची आवड लागली. एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना सिद्धीने शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीये आणि ती लिलाय पारसुद्धा पाडतीये.
खरंतर कोरोनाच्या निमित्ताने अनेकजण शाळा, कॉलेजच्या वातावारणापासून दुरावले. त्याचप्रमाणे सिद्धीलाही या काळात घरी राहण्याचा योग आला आणि शेतीशी जवळून संबंध आला. तशी तिला लहानपणापासूनच शेतीची आवड होती पण कोरोना काळापासून ती शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करू लागली. पिकाला पाणी देणे, खुरपणे, औषधे सोडणे, वेळ आली तर फवारणी करणे, माल काढण्यास आईवडिलांना मदत करणे अशी छोटमोठी कामे ती करत होती.
जसंजसं ती शेतात काम करू लागली तसं शेतीमध्ये काम करूनही आपण चांगले पैसे कमावू शकतो असा विश्वास तिला निर्माण झाला. त्यामुळे तिने शिक्षण सुरू ठेवून पूर्णवेळ शेतीसाठी द्यायचा निर्णय घेतला. आता ती शेतीमध्ये वांगे, पालक, काकडी, कांदे, पालक, कोथिंबीर आणि इतर भाजीपाला पिके घेते.
शेतीची धुरा एकची सांभाळते
शेतातील छोटमोठ्या कामापासून माल विक्रीपर्यंतची सर्व कामे सुद्धी एकटी करते. भाजीपाला लागवड, फवारणी, व्यवस्थापन आणि विक्रीची सर्व जबाबदारी सिद्धी पार पाडते. विशेष म्हणजे माल थेट मार्केटला नेऊन विक्री करायचा की विक्रेत्यांना थेट शेतावर विक्री करायचा हा निर्णयसुद्धा सिद्धीच घेते.
स्वतः टेम्पो चालवून मार्केटमध्ये
आपला शेतमाल सिद्धी स्वतः टेम्पोमध्ये भरून मार्केटला नेते. जर माल कमी असेल तर ती दुचाकीवरून माल घेऊन जाते. शेतमाल घेऊन मार्केटला गेल्यावर इतर शेतकरी आणि व्यापारी तिच्याकडे आश्चर्याने बघतात. अनेकजण रस्त्याने जाताना तिचे कौतुकही करतात.
'नोकरीपेक्षा शेती भारी'
'सध्याचा काळात एक तर नोकरी मिळत नाही आणि मिळाली तर त्यामधून आपल्याला जास्तीत जास्त २० ते २५ हजार रूपयांपर्यंत पगार मिळतो. पण त्यापेक्षा शेतात कष्ट केले तर आपण जास्त पैसे कमावू शकतो. इथे ना कुणाचा दबाव, ना कसले टार्गेट, इथे आपले मालक आपणच असतो त्यामुळे नोकरीपेक्षा शेती भारी...' असं सिद्धी सांगते.
'मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो'
'मला तीन मुली आहेत, त्यापैकी दोघींचे लग्न झाले आहेत. पण या मुलींनी मला कधीच मुलाची कमी वाटू दिली नाही. माझ्या तिन्ही लेकी शेतामध्ये काम करायच्या. लग्न झालेल्या मुली माहेरी आल्या तरी त्या शेतात काम करतात. मला माझ्या मुलींचा अभिमान वाटतो.' असं सिद्धीच्या आई सांगतात.