दादा चौधरीदौंड तालुक्यातील खोर येथील जालिंदर कुंडलिक डोंबे यांच्या स्वभावातच संशोधक, सामाजिक आणि वारकरी वृत्ती दिसून येते. स्वावलंबनातून स्थैर्याकडे, श्रमातून समृद्धीकडे, शास्त्रीय ज्ञान, अनुभवातून प्रगतीकडे आणि शेतीतून समग्र परिवर्तनाकडे असा त्यांचा दृष्टिकोन आहे.
याच पद्धतीने घरच्या लोकांच्या मदतीने, वडिलोपार्जित शेतीमध्ये दर्जेदार अंजिराचे यशस्वी उत्पादन घेऊन त्यातील मास्टर व मार्गदर्शक म्हणून त्यांनी ओळख मिळवली आहे. खोरमधील डोंबेवाडी हे जवळपास दीड हजार लोकसंख्येचे गाव.
या भागातील बहुतांश जमीन जिरायती प्रकारची आहे. जालिंदर डोंबे यांनी अथक परिश्रमातून वडिलोपार्जित माळराण जमिनीवर अंजिराची बाग फुलवली आहे. अंजिराच्या बागेमध्ये घरातील लहान थोरांसह सगळेजण काम करतात.
त्यांनी एका एकरात साधारणतः १८० झाडे लावली आहेत. झाडांची लागवड १५ बाय १५ फुटावर केलेली आहे. लागवडीसाठी त्यांनी पुना फिग या अंजिराच्या जातीची निवड केलेली आहे.
रासायनिक खतांचा कमी प्रमाणात वापर तसेच सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करून ते अंजिराचे उत्पादन घेतात. एका झाडाला साधारणतः ते आठ ते दहा पाट्या शेणखत घालतात.
सेंद्रिय खतांचा वापर केल्याने मालाला चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगल्या प्रकारे मिळतो. तसेच चांगल्या प्रकारच्या उत्पादनासाठी मातीचा प्रकार, पाण्याचा निचरा, दलदलीचे प्रमाण कमी या बाबीही खूप महत्त्वाचे असतात, असे जालिंदर डोंबे सांगतात.
बागेच्या फवारणीसाठी ते आधुनिक यंत्रांचा वापर करतात. जालिंदर डोंबे खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहरात अंजिराचे उत्पादन घेतात. खट्टा बहारासाठी ते मे-जून मध्ये झाडाची छाटणी करतात तर मिठा बहारासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी करतात.
दोन्ही बहारामध्ये छाटणी केल्यानंतर साडेचार महिन्यांनी अंजीर तोडायला तयार होते. या पद्धतीने बागेचे नियोजन केल्याने वर्षातील काही महिने अंजीर सुरू राहते. जालिंदर डोंबे एकरी पंधरा टनापर्यंत अंजिराचे उत्पादन घेतात.
एका झाडाच्या फांदीवर साधारणतः ५० ते १० फळे ठेवतात. दोन्ही बहरात अंजिराला प्रति किलो ५० ते १०० रुपये भाव मिळतो. उत्पादित केलेले अंजीर ते पुण्याला विक्रीसाठी नेतात.
सध्या महाराष्ट्र राज्याच्या कोनाकोपऱ्यातून व्यापारी जागेवर अंजीर खरेदी करण्यासाठी येतात. उत्पादन खर्च एकरी दोन लाख रुपये होतो तर वार्षिक उत्पन्न पाच ते सहा लाख रुपयेपर्यंत मिळते. इतर फळबागाचे तुलनेत अंजिरातून निश्चितच चांगले उत्पन्न मिळते.
सध्या बदलत्या हवामानाचा परिणाम अंजीर उत्पादनावर होत असल्याने अंजीर उत्पादनासाठी शासनाने अंजिराच्या सूक्ष्म सिंचनासाठी आर्थिक मदतीची तरतूद करावी तसेच अंजीर पिकाचा समावेश पीक विम्यामध्ये करावा. - जालिंदर डोंबे, अंजीर उत्पादक शेतकरी