विकास शहाबिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील प्रगतिशील शेतकरी मानसिंग पाटील यांनी देशी पावट्याच्या शेतीची ५१ वर्षांची परंपरा राखत डोंगराळ भागातील ३० गुंठे क्षेत्रात पावट्याचा मळा फुलवून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मुंबई, पुणेकरांनाही बिऊरच्या देशी पावट्याच्या चवीने भूरळ घातली आहे.
शांतीनगर पाझर तलावानजीक असलेल्या डोंगर रानातील ३० गुंठे जमिनीत पेरणी केली. वेळोवेळी औषध फवारणी करून वातावरणातील बदलाला सामोरे जात त्यांनी माळरानावर बाग फुलवली. नुकतीच तोडणी सुरू झाली असून प्रतिदिन ३० ते ४० किलो उत्पादन निघत आहे. पहिल्या तोड्यापासूनच जवळपास १०० ते १५० रुपये दर मिळत असून दरवाढीचाही फायदा होत आहे.
यावर्षी सरासरी एवढा पाऊस पडलेला नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व बोचरी थंडी आणि टोकण झाल्यापासूनच पावट्याला पोषक वातावरण आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात सर्वत्रच बांधावरील देशी पावटा बहरला आहे. सध्या पडत असलेल्या थंडीने पावट्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा: वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल
या देशी पावट्याची चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे. अजूनही एक महिना बाग चालू राहणार असून ४० रुपये ते ५० रुपये पावकिलोला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासून तीन महिने सरासरी २०० रुपयांचा भाव मिळेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
जागेवरूनच खरेदी• देशी पावटा असल्याने त्यांना विक्रीसाठी बाजारात जावे लागत नाही.• खवय्ये जागेवरूनच खरेदी करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.• रोज निघणारे उत्पादन व्यापाऱ्यांना न देता जोडीला दोन मजुरांना बरोबर घेऊन शेतातच स्वतः विक्री करतात.• अजूनही दोन महिने उत्पादन निघेल.
केवळ पावसावर अवलंबून व थंडीमुळे येणारा हा गावठी पावटा चवीस खूप छान आहे. स्थानिक बाजारातही या पावट्याला मोठी मागणी आहे. बिऊर-शांतीनगर परिसरातील शेतकऱ्यांनी देशी वाण जपून ठेवला आहे. यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक फायदा होत आहे. - मानसिंग पाटील, शेतकरी