सलग १५ वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर शुभांगी डबरे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पती आदिनाथ यांचे भक्कम पाठबळ लाभले. पारंपरिक शेतीमध्ये श्रम, पैसा जेवढा खर्च होतो, तेवढ्या प्रमाणात उत्पादन मिळत नसल्याने नुकसान होते. त्यामुळे शुभांगी यांनी तंत्रशेतीचा निर्णय घेतला आणि कलिंगड, काळा तांदूळ, विविध प्रकारच्या भाज्यांचे विक्रमी उत्पादन घेत नवा धडाच दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाकडूनही त्यांना गौरविण्यात आले आहे.
तंत्रशेती करत असताना त्यांनी कलिंगड लागवड केली. एक एकर क्षेत्रात त्यांनी २५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन दखल तत्कालिन कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेत त्यांच्याशी संवाद साधून उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा प्रशासनाकडूनही वेळोवळी सन्मानित करण्यात आले आहे. टोमॅटो, भेंडी, वाली, काकडी, दोडके, पडवळ, मिरची, कारली, झेंडू लागवड करून उत्पादन मिळवीत आहेत. सेंद्रीय शेतीमुळे त्यांच्याकडील भाजीपाला उत्पादनांचा दर्जा उत्तम असल्याने मागणी प्रचंड आहे. विक्रीसाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. शेताच्या बांधावरच विक्री होते. त्यांच्याकडे देशी गायी असून शेण, गोमूत्रापासून सेंद्रीय खते, जीवामृत तयार करून त्याचा वापर पिकांसाठी करत आहेत. भाजीपाला उत्पादन फायदेशीर असल्याचे शुभांगी यांचे मत आहे.
विक्रमी उत्पादन दीड एकर क्षेत्रावर
पावसाळ्यानंतर भातकापणी झाल्यावर कलिंगड लागवड करतात. फेब्रुवारी, मार्चमध्ये कलिंगड विक्रीला बाजारात येईल, हे नियोजन करून लागवड केली जाते. एक एकर क्षेत्रावर २५ टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन घेण्यात शुभांगी यांनी यश मिळविले आहे. पती आदिनाथ स्वतः प्रयोगशील शेतकरी आहेत. मुलगा संगणक अभियंता, मुलगी औषधनिर्माणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण आहेत. शुभांगी यांच्या दोन्ही मुलांना शेतीची आवड असल्याने आई-वडिलांना शेतीकामात मदत करतात. सहली, प्रशिक्षणाद्वारे शुभांगी मार्गदर्शन करत आहेत.
काळा तांदूळ 'लक्षवेधी'
पंजाबमधून दहा किलो काळा भात आणून लागवड केली. २० गुंठे क्षेत्रात एक टन भाताचे उत्पादन घेण्यात त्या यशस्वी झाल्या. औषधी गुणधर्म असल्यामुळे काळ्या तांदळाला मागणी अधिक आहे. दीड एकर क्षेत्रावर विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाची लागवड शास्त्रोक्त पद्धतीने करत आहे. नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यावर प्लास्टिक पेपरचे मल्चिंग केले जाते. मल्चिंगमुळे तण उगवत नाही, कीड-रोगाचा फारसा परिणाम होत नाही. ठिबकद्वारे पाणी, खते देणे सुलभ होते. स्वतः ची रोपवाटिका तयार केली असून विविध प्रकारची रोपे त्या तयार करून विक्री करत आहेत. कोकणच्या लाल मातीत वेलवर्गिय, फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड करून वर्षातून तीन वेळा उत्पादन घेत आहेत.
योग्य नियोजन, उत्पादन शुभांगी शिक्षक असल्याने कोणतीही
लागवड करण्यापूर्वी त्याचा पुरेपूर अभ्यास करतात. भाज्यांना वाढती मागणी आहे, मात्र बाजारपेठेतील मागणी ओळखत लागवड करावी असे शुभांगी यांचे मत आहे. शुभांगी यांची स्वतः ची शंभर आंबा कलमे तर १५० काजूची झाडे आहेत. आंब्याची खासगी विक्री तर काजू बी योग्य भावाला त्या विक्री करत आहेत.