गत दहा वर्षांपासून रेशीम शेती यशस्वीरीत्या करीत आनंदगाव (ता, परतूर) येथील अभिजित शिंदे याने कुटुंबाच्या प्रगतीचे धागे विणले आहेत. अभिजित शिंदे याने साधलेली कुटुंबाची प्रगती पाहता या भागातील अनेक शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करीत रेशीम शेती करण्यावर भर दिला आहे.
कधी अवकाळी, कधी गारपीट, कधी कोरडा दुष्काळ तर कधी रोगराई अशा एक ना अनेक कारणांनी शेती आतबट्ट्याची झाली आहे. या संकटांवरही मात करीत अनेक युवा शेतकरी विविध यशस्वी प्रयोग शेतीत करीत आहेत. आनंदगाव येथील युवक अभिजीत रामेश्वर शिंदे यानेही रेशीम शेती करण्याचा संकल्प केला. दहा वर्षापूर्वी अडीच एकरात तुतीची लागवड करून रेशीम उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. कान्हाळा येथील शेतकरी लक्ष्मण सोळंके यांनी या कामी शिंदे याला मोलाचे मार्गदर्शन केले. मागील दहा वर्षांपासून एका वर्षात सात ते आठ बॅच घेऊन प्रत्येक बॅचला सरासरी एक लाख रुपये उत्पन्न शिंदे घेत आहे.
वर्षभर दोन नियमित मजूर आणि रेशीम कोष काढताना शेवटच्या दोन दिवस दहा ते बारा महिला मजूर असा प्रत्येक बॅचला वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च होतो. खर्च वजा पाच ते सहा लाख रुपये उत्पन्न वर्षाकाठी मिळत असल्याचे शिंदे सांगतो. रेशीम शेतीतून शिंदे यांच्या कुटुंबाची होणारी प्रगती पाहता गावातील १४ ते १५ शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेतीतून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे.
अतिवृष्टी झाली किंवा कमी पाऊस झाला तरी तुतीचे नुकसान होत नाही. खत आणि फवारणी वारंवार करावी लागत नाही. दरही चांगला मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत रेशीम शेती फायद्याची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेशीम शेतीचा मार्ग निवडावा, -अभिजीत शिंदे, रेशीम उत्पादक
अनुदानाचा होतो लाभ
कृषी विभागाकडून रेशीम शेती उत्पादक शेतकऱ्यांना, शेतीगटांना तुती लागवड व त्यासाठी लागणाऱ्या रोडसाठी अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवडीकडे वळावे.- लक्ष्मण सोळंके, अध्यक्ष संत तुकाराम शेतकरी गट काहाळा