'ती' एक मनस्वी कलाकार. क्लायमेट चेंजमुळे मानवी जीवनावर होणारे परिणाम पाहून संतप्त होते काय, मैत्रिणीला सोबत घेऊन ओसाड जमिनीची मशागत करते काय, शेकडो विद्यार्थी म्हणून स्वयंसेवक तिच्या मदतीला येतात काय, सहज म्हणून पेरलेले गहू काही काळानंतर सोन्यासारख्या राशीत परावर्तित होतात काय आणि त्यातून कल्पनाही करू शकणार नाही असे काही सामाजिक प्रश्न सुटतात काय !. सारेच अकल्पित. त्यातून अमेरिकेसारख्या देशात एक वेगळीच 'शांतीत क्रांती' घडून आली. डेनेसने केलेल्या या क्रांतीची गोष्ट जगभर चर्चिली जात आहे.
ही गोष्ट घडली अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील लोअर मॅनहॅटनमध्ये, जिने ती घडवून आली तिचं नाव अॅग्नेस डेनेस. पर्यावरणावर तिचं विशेष प्रेम. त्यातून पर्यावरणीय कलाकृती तिनं उभारल्या. त्यापैकी एक म्हणजे गव्हाचं शेत. हे गव्हाचं शेत केवळ कलाकृती नसून भुकेल्यांचं पोट भरण्याचं माध्यम झालं आहे.
एकीकडे प्रचंड शहरीकरण वाढू लागलं. त्यात शेतजमिनींचा बळी जावू लागला. या गोष्टींमुळे डेनेस अस्वस्थ आणि संतप्त झाली होती. त्यातूनच तिने शहराच्या मध्यवर्ती भागात गव्हाचं शेत लागवडीला घेतलं.
डेनेस यांनी दोन एकर ओसाड जमीन आधी स्वच्छ केली. त्यावरचे कचऱ्याचे ढीग हटवले. जमीन एकसारखी केली. १९८२ पासून या जागेवर काम सुरू झाले. या जागेला दिन टॉवर्सची पार्श्वभूमी आहे. बंडखोरीची कृती म्हणून सुरू केलेले हे काम आज वेगळेच फळ देत आहे. आता डेनेस ९३ वर्षांच्या आहेत.
अमेरिकेच्या आर्थिक राजधानीतील शेवटच्या अविकसित भूखंडांपैकी एकाचा वापर करून एक रमणीय ठिकाण त्यांनी तयार केले, ते म्हणजे गव्हाचे शेत. १९८० हा काळ न्यूयॉर्कमधला अवघड काळ जगणे अवघड होते.
कारण साध्या साध्या मानवी गरजा पूर्ण करणे अनेकांना अशक्य होत होते आणि दुसरीकडे विकासाच्या नावाखाली माणसाची भूकेची गरज भागवणारी शेतजमीन विकासकांच्या घशात जात होती. परिस्थिती सुधारली पाहिजे हा विचार डेनेसच्या मनात सारखा पिंगा घालत होता.
या विचारांतूनच त्यांनी मॅनहॅटन येथे गव्हाच्या शेतीचा मार्ग शोधला. डेनेस यांनी काम सुरू केले तेव्हा हा भाग ओसाड, ओबडधोबड होता. येथे पेरणी, मशागत करणे हे फार खर्चिक काम होते. विरोधाभास वाटावी अशी परिस्थिती होती.
डेनेस यांनी काम सुरू केलं तेव्हा दोन एकर जमिनीवर २०० ट्रक कचरा निघाला. ज्यात दगड, माती, शेतीला नुकसान करणाऱ्या गोष्टी होत्या. त्यावेळी पर्यावरणीय संकटाची चर्चा नव्हती. विशेष म्हणजे या जमिनीला लागून ट्रीन टॉवर्स विकसित होत होते.
चार दशकांनंतर आज त्या जागी सोन्यासारखे पिवळेधमक गव्हाचे पीक तरारले आहे. खरंतर या जागी त्यांना एक कलाकृती साकारायची होती. कलाकृती साकारून झाल्यानंतर ती बघायला लोकांनी यावं, पण ती नुसती बघून न जाता त्या जागी जास्तीत जास्त काळ राहून वेगळी अनुभूती घ्यावी, अशी डेनेस यांची अपेक्षा होती. त्यातूनच गव्हाच्या शेतीची संकल्पना त्यांना सुचली.
याठिकाणी भूक या विषयावर आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन भरविण्यात येणार होते. त्यानंतर येथे पिकेलेले धान्य २८ देशांचा प्रवास करणार होते. त्याकाळी याठिकाणी उभे राहिल्यावर एकाच वेळी गव्हाचे शेत, शेजारी शांततेच्या देवतेचा पुतळा, एलिस आइसलैंड आणि बोटींची गर्दी असे विरोधाभासी चित्र दिसायचे.
शेतजमिनी विकत घेऊन तेथे गगनचुंबी इमारती, व्यापारी संकुले, आधुनिक सोयीसुविधा केंद्रे उभारली जायची. एकीकडे लोक अन्नाविना तळमळत जीवन जगत असताना दुसरीकडे पैशांची उधळण केली जात होती. यामुळे डेनेस अतिशय अस्वस्थ झाल्या.
हे चित्र बदलण्याचा मनापासून प्रयत्न डेनेस यांनी केला. त्यांनी जीव लावून केलेल्या शेतात गव्हाचं पीक तरारून आलं. ते कापून, साठवून त्याचे पीठ तयार करण्यात आले. ते स्थानिक बेकऱ्यांमध्ये वाटण्यात आलं आणि त्यापासून तयार झालेले पदार्थ भुकेलेल्यांना मोफत देण्यात आले.
अनेक गरजूंना बियाणांची पाकिटे मोफत देण्यात आली. सामाजिक प्रश्नांबरोबर गहू चळवळही त्यांनी रुजवली. क्रांतिकारी विचारातून एक कलाकृती उभी राहिली आणि नंतर ही कलाकृती गरजूंची आधार झाली.
वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती 'ट्री माउण्टन' !
अग्नेस डेनेस या अमेरिकेतील वैचारिक आणि पर्यावरणप्रेमी कलाकार म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. आपली कला जोपासताना अनेक सामाजिक प्रश्नांवर त्यांनी काम केले. सामाजिक प्रश्न डोळ्यांपुढे ठेवून त्याला अनुसरून अनेक प्रदर्शने मांडली. लोकांमध्ये जनजागृती केली. त्यांची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणीय कलाकृती म्हणजे फिनलंड येथील ट्री माउण्टन', लोकांना सहभागी करून घेत त्यांनी ११,००० झाडं तिथे चक्राकार पद्धतीने लावली.
अधिक वाचा: शेती आधारित या व्यवसायांसाठी महिलांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, कसा कराल अर्ज