सुधीर चेके पाटील
विदर्भ ज्याप्रमाणे सांस्कृतिक वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे येथील अनोख्या व लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. याच खाद्य संस्कृतीपैकी एक असलेल्या रोडगे जेवणाचा कार्यक्रम. घर, शेती वा जंगल विदर्भात प्रामुख्याने हिवाळा व उन्हाळ्यात सर्वत्र चुलीवरची वांग्याची भाजी, वरण आणि रोडगे असा जेवणाचा फर्मास बेत सर्वत्र आयोजित केला जातो. हीच संधी हेरून जिल्ह्यातील २५ जणांच्या एका समूहाने या माध्यमातून रोजगाराचा स्रोत शोधला आहे.
संत एकनाथ महाराजांच्या 'सत्वर पाव गे मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला? भवानी आई, रोडगा वाहीन तुला' या भारुडाप्रमाणे विदर्भात देवी, देवताना बोललेला नवस फेडण्यासाठी रोडगे जेवणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत असतात.
रोडगे गव्हाच्या जाडसर पिठापासून बनविले जातात. पिठामध्ये तेलाचे मोहन घालून त्यात मीठ टाकून पीठ भिजविले जाते. नंतर छोट्या तीन किंवा चार चपात्या लाटून त्याचा गोळा बनविला जातो. तो गोळा शेतशिवारात साधारणतः एक फुटापर्यंत खोल व गरजेनुसार रुंद करून त्यात शेणाच्या गोवऱ्यांवर भाजल्या जातात. याच्या दिमतीला वरण, वांग्याची भाजी, ठेचा आणि भरपूर तूप आणि गूळ असा हा एकूण फर्मास बेत असतो.
एखाद्या शेतात, उन्हाळ्यांच्या सुटीत मोहरलेल्या आंब्याच्या झाडाखाली रस्सेदार वांग्याची भाजी आणि रोडग्यावर ताव मारणाऱ्या पार्ट्याही रंगतात. आता तर चुलीवरचे जेवण मिळणे दुरापास्त झाले असल्याने वीकेंडला शेतात, फार्महाउसवर रोडगा पार्थ्यांचा बार उडत असतो. मात्र, हा सर्व बेत आखताना ते जेवण त्या खास विशिष्ट पद्धतीने बनविणे महत्त्वाचे ठरते.
रोजगाराची वेगळी वाट
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरोडी येथील २० ते २५ जणांचा एक गट रोडगे जेवण बनवून देण्यासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे. यापोटी त्यांना मेहनताना द्यावा लागत असला तरी, एकदा त्यांच्यावर जबाबदारी सोपवली की, अगदी बोटे चाखत राहाल इतक्या लज्जतदार जेवणाची हमी असल्याने, वरोडीतील या मंडळींना सध्या मोठी डिमांड आहे.
सर्वत्र एक ते दीड किलोपर्यंतचा आणि गव्हाच्या पिठात एक गोळा ठेवून भाजण्याची पद्धत आहे. परंतु, यास वेगळेपण देत वरोडी येथील तरुणांकडून साधारणतः तीन ते चार किलोंचा एक रोडगा बनविला जातो. या रोगड्याचे वैशिष्ट म्हणजे यात चार ते पाच थर ('लेअर') असतात.