सोनपेठ : घरी हलाखीची परिस्थिती त्यामुळे जेमतेम दहावी पर्यंत शिक्षण झाले न झाले तोच घरच्यांनी लग्न लावून दिले. लग्न झाल्यानंतरही आर्थिक परवड ठरलेलीच. यातून बाहेर पडायचे तर स्वतः काहीतरी केले पाहिजे हा निश्चय केला अन् नऊ वर्षांनंतर खंडित झालेलं शिक्षण सुरू केलं. वयामुळे शारीरिक कुरबुरी सुरू झालेल्या त्यातही जिद्द जिवंत ठेवली अन् थेट पीएसआय होऊनच त्या थांबल्या...
ही कहाणी आहे परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील सोनिया चंद्रकांत मोकाशे या शेतकऱ्याच्या मुलीची. नुकतीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली. स्वतः मधील जिद्द आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हा खडतर प्रवास सुकर झाला अन् कान्हेगाव या गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान सोनिया ने मिळवला.
नऊ वर्षानंतर शिक्षणाची कास...२००७ ला लग्न होऊन सासरी आले. त्यांनंतर बराच काळ गेला. शिक्षणाचा गंध नव्हता. घरची परिस्थिती हलाखीची त्यामुळे काय करावे सुचत नव्हते. २०१६ ला काहीतरी करायचे या उद्देशाने अकरावीला प्रवेश घेतला. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण सुरू केले. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याचबरोबर पोलीस भरतीचीही तयारी सुरू केली. पोलीस कॉन्स्टेबल पेक्षा आपण पीएसआय का होवू नये, असे वाटले अन त्याचीही तयारी सुरू केली. मैदानी सराव करत असतांना पायांना प्रचंड वेदना व्हायच्या मात्र तरीही सराव सुरू ठेवल्याचे सोनिया सांगतात.
भावाचे आर्थिक पाठबळ अन नणंदेची साथ...पदवीचे शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती. त्यावेळी आठ वर्षाची मुलगी असतांना तिला एकटीला टाकून जाता येत नव्हते. माझी नणंद शीतल सोळंके हिने मुलीचा सांभाळ करत मला यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला. मात्र, घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आर्थिक चणचण होती. त्यामुळे भाऊ पद्माकर याने शिक्षण सोडून छत्रपती संभाजीनगर येथे खासगी कंपनीत नोकरी करत पैसे पुरवले. वडिलांनी सालगडी म्हणून राहत पैसे पुरवले.
अन् गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक...गावातील पहिली महिला अधिकारी होण्याचा मान सोनियाने मिळवला. निकाल जाहीर होताच गावकऱ्यांनी तिची जंगी मिरवणूक काढत सत्कारही केला. ज्या शाळेतून अ, ब, क चे धडे गिरवले त्याचं शाळेनेही गौरविलेही.
सेल्फ स्टडीचा फायदा... घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने खासगी शिकवणी लावणे परवडणारे नव्हते. त्यामुळे सेल्फ स्टडी केली. गंगाखेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, पुणे या ठिकाणी मित्रांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने अभ्यास सुरू ठेवला. त्याचबरोबर मैदानी सरावही सुरू ठेवला. यावेळी प्रचंड अडचणी आल्या. त्यात कुटुंबाने मोलाची साथ दिली.- सोनिया मोकाशे, पोलीस उपनिरीक्षक
सोनियाचा हा प्रवास सोपा नव्हता. लग्नानंतर नऊ वर्षांनी शिकायचे, असे तिने सांगितले. तेव्हा आम्हीही आश्चर्यचकित झालो होतो. पण तिची जिद्द पाहून तिला साथ दिली. अन् पोरीने जिद्दीने करून दाखवलं.- चंद्रकांत मोकाशे, सोनियाचे वडील