मेहरून नाकाडे
रत्नागिरी : आंबा पिकाप्रमाणे काजू पीकही खर्चीक झाले आहे. हवामानातील बदलामुळे पिकाची उत्पादकता घटू लागली आहे. यावर संशोधन करून लांजा तालुक्यातील आरगाव येथील प्रगतशील शेतकरी अमर खामकर यांनी काजूची नवीन जात विकसित केली आहे.
ही जात भरघोस उत्पन्न देणारी ठरणार असून, नव्या संशोधित जातीला 'एकेआर' हे नाव देण्याचा त्यांचा मानस आहे.
विद्यापीठाच्या वेंगुर्ला ४ काजूच्या जातीपासून १५ किलो उत्पादन मिळेल, असा विद्यापीठाचा दावा आहे. प्रत्यक्ष ५ ते ८ किलोच उत्पन्न मिळते, तर वेंगुर्ला ७ या काजूचे एक वर्षाआड उत्पन्न मिळते. तेही ३/४ किलो असते. आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने खामकर यांनी संशोधन केले.
आठ वर्षांच्या संशोधनानंतर त्यांना त्याचे फलित सापडले आहे. गावठी काजूची जात निवडून त्याला कलम बांधले आहे. त्यांनी लागवड केलेली रोपे अन्य शेतकरी मित्रांनाही देऊन उत्पादकता तपासली असता, सकारात्मक रिझल्ट्स मिळाले आहेत.
नव्या विकसित केलेल्या काजूला मुबलक प्रमाणात येणाऱ्या फुलोऱ्यांमध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अन्य जातीच्या काजूच्या रोपांच्या तुलनेत या संशोधित जातीमध्ये फळधारणेचे प्रमाण अधिक आहे.
खते, फवारणीच्या खर्चामध्येही घट होणार आहे. शिवाय झाडाचे आयुर्मानही जास्त असल्याचे अमर खामकर यांनी सांगितले. संशोधन यशस्वी झाले असून, कृषी विद्यापीठाच्या मान्यतेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून उत्पन्न
- 'एकेआर' या नवीन जातीच्या काजूची रोपे लागवडीपासून चौथ्या वर्षापासून उत्पन्नाला सुरुवात होते.
- एकरी ७० झाडे बसतात.
- झाडाचे आयुर्मान ४० ते ५० वर्ष आहे.
- दहा वषपिक्षा जास्त वयाच्या कलमाची २० ते ५० किलोपर्यंत उत्पन्न देण्याची क्षमता आहे.
- मधमाश्यांची पेटी बागेत ठेवली तरी मधाच्या उत्पन्नाबरोबर काजूचेही भरघोस उत्पन्न घेणे शक्य होते.
- नव्या संशोधित जातीच्या रोपांच्या फुलोऱ्यामध्ये नर जातीच्या फुलांपेक्षा मादी जातीच्या फुलांची संख्या जास्त असल्याने फुलोऱ्याचे फळधारणेमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काजूचे भरघोस उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे.
नर्सरीमुळे सतत संशोधन
प्रयोगशील वृत्तीमुळे अमर खामकर हे सतत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. स्वतःची नर्सरी असून, त्यामध्ये त्यांचे संशोधन सुरू असते. कोकणात रेशीम शेतीचा प्रयोग त्यांनी यशस्वी तर केलाच, शिवाय अन्य शेतकऱ्यांनाही करण्यास भाग पाडले. आर्थिकदृष्ट्या परवडणारी व उत्पादन अधिक देणारी शेतीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.
विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ७ या जातीच्या काजूपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यामुळेच यामुळेच मी गावठी काजू रोपावर कलम बांधले. आठ वर्षाच्या संशोधनानंतर भरघोस उत्पादन, फांद्या मजबूत, बुरशीचे प्रमाण नसल्याचे निदर्शनास आले. दहा ते बारा झाडे स्वतः लावली असून, काही मित्रांनाही झाडे दिली आहेत. त्यांनाही माझ्याप्रमाणे सकारात्मक बदल मिळाले आहेत. कलमे पिशवीत असतानाच फळधारणा झाली. प्रयोगाला यश आले असून, नवीन जातीसाठी मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. व्यावसायिक हेतूने शेती करत असल्यामुळे तसे संशोधन करत असतो. - अमर खामकर, आरगाव