दीपक माळी
माडग्याळ : अवर्षणप्रवण भागात शेती करणे तसे आव्हानात्मक. मात्र, प्रयोगशीलता व सचोटीने दुष्काळी जत तालुक्यातील दशरथ सावंत या शेतकऱ्याने दिमाखदार भरारी घेतली आहे.
कमी खर्चामध्ये सावंत यांनी दीड एकरामध्ये डाळिंब बाग फुलवली असून १२ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. दशरथ सावंत यांनी आपल्या दीड एकरात गणेश जातीचे डाळिंब झाडांची लागवड केली आहे.
गेल्यावर्षी याच दीड एकरात त्यांनी आठ लाखांचे उत्पन्न घेतले होते. मात्र, यावर ते थांबले नाहीत. नव्या उमेदीने कष्ट करून यंदा आपली बाग फुलवली. केलेल्या कष्टाला फळ मिळते हे त्यांना शेतीमधील विक्रमी उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे.
आतापर्यंत त्यांच्या बागेतून दोन टप्प्यांतून आठ टनांचे उत्पादन मिळाले आहे. सावंत यांना सरासरी प्रतिकिलो ११० रुपयांप्रमाणे भाव मिळाला आहे.
यातून त्यांनी आतापर्यंत आठ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून अद्याप बागेतून चार ते पाच टन माल निघेल असा त्यांचा अंदाज आहे. यातून त्यांना अंदाजे एकूण १२ ते १३ लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
औषधे व कामगारांचा खर्च तीन लाख रुपये वजा केल्यास १० लाखांचा निव्वळ नफा होणार आहे. दशरथ सावंत यांनी पाण्याची उपलब्धता बघत जूनच्या पहिल्या आठवड्यात छाटणी घेतली.
पाण्याचे योग्य नियोजन करत इतरांकडून वेळोवेळी मार्गदर्शन घेत त्यांनी आवश्यकतेनुसार औषधांचा वापर केला. बाजारभावात डाळिंबाला चांगली किंमत असतानाच त्यांची बाग हाताला आली असल्याने त्यांना यातून चांगला नफा मिळाला आहे.
कायम दुष्काळ व लहरी निसर्गामुळे शेतकरी कायम तणावातच शेती करतो; पण योग्य नियोजन व बाजाराचा अंदाज घेत कष्ट केल्यास शेतातून चांगले उत्पन्न मिळू शकते. माझ्या आठ टन डाळिंबाची विक्री झाली असून अजून पाच टनांचे डाळिंब निघणार आहेत. योग्य नियोजन व औषधांचा जास्त वापर न केल्याने चांगले उत्पन्न मिळाले. - दशरथ सावंत, माडग्याळ, प्रगतिशील शेतकरी
अधिक वाचा: केळी पिकात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकरी धैर्यशील यांनी घेतले एकरी १० लाख रुपयांचे उत्पन्न