पुणे : सांगली हे नाव ऐकलं की सांगलीची हळद आपल्याला आठवते. सांगलीची हळद प्रसिद्ध आहे आणि येथील हळदीला भौगोलिक मानांकनसुद्धा मिळालंय. पण राज्यातील अनेक भागातील शेतकरी हळदीचे पीक घेतात आणि चांगला नफासुद्धा कमावत आहेत. पण पुण्यातील अभिनव फार्मर्स क्लबचे शेतकरी ज्ञानेश्वर बोडके हे केवळ तीन गुंठे क्षेत्रात हळदीचे पीक करतात आणि त्यातून सुमारे वर्षाकाठी ५ लाख रूपये कमावतात असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ज्ञानेश्वर बोडके हे सेंद्रीय शेती करणारे आणि थेट ग्राहकांना भाजीपाला विकणारे शेतकरी असून अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातून त्यांनी सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा ग्रुप तयार केला आहे. ते पुण्यातील हिंजवडीजवळील बोडकेवाडी येथे शेती करतात. त्यांनी आपल्या पॉलीहाऊसमध्ये केवळ तीन गुंठ्यांमध्ये तीन प्रकारच्या हळदीची लागवड केली आहे. त्यामध्ये पिवळी हळद, पांढरी हळद आणि काळी हळदीचा सामावेश आहे.
हळदीची काढणी केल्यानंतर ते एक कंद तसाच जमिनीत ठेवतात आणि त्यापासून पुन्हा एक नवीन हळदीचे रोप तयार होते. दरम्यान, काळी हळद आणि पांढऱ्या हळदीचे आरोग्यातील महत्त्व अनन्यसाधारण असल्यामुळे या हळदीची विक्री तब्बल १ हजार रूपये प्रतिकिलो दराने होते. आरोग्याविषयी सजग असणारे नागरिक या हळदीची खरेदी करतात.
तर बोडके हे दररोज एक हजार ते दीड हजार रूपयांच्या हळदीची विक्री करतात. त्यामध्ये ते पिवळी ओली हळद २०० रूपये किलो तर काळी आणि पांढऱ्या रंगाची हळद एक हजार रूपयांनी विक्री करतात. ते दररोज हळदीची विक्री करत असल्यामुळे वर्षाकाठी पाच लाखांपर्यंत हळदीची विक्री होते असं ते सांगतात.
विशेष म्हणजे केवळ तीन गुंठ्यातून ते पाच लाखांचे उत्पन्न काढतात. कारण सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या शेतमालाची नीट मार्केटिंग आणि योग्य ग्राहक मिळवले तर त्याची चांगली किंमत शेतकऱ्यांना मिळते. याच पद्धतीने बोडके हे इतर सेंद्रीय शेतमालाची विक्री आणि मार्केटिंग करतात.