गजानन पाटील
दरीबडची: आंबा म्हटले की कोकणाची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील बनाळी (ता. जत) येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम मारुती सावंत यांनी शेतीत क्रांती केली आहे.
सोना-चांदी दुकान व्यवसाय सोबत आधुनिक पद्धतीने उजाड फोंड्या माळरानावर दोन एकर क्षेत्रावर केशर आंब्याची बाग फुलविली आहे. यावर्षी तीन लाख रुपयाचे आंबा उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे.
बनाळी येथील तुकाराम सावंत यांनी १९७५ पासून कोईमतूर-तमिळनाडू येथे गलाई व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांना जोड व्यवसाय म्हणून शेतीची आवड असल्याने त्याने बनाळी येथे आपल्या वडिलोपार्जित जमिनीत आंबा व मोसंबीची लागवड केली.
यावर्षी तीन लाख रुपयाचे आंबा उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. सेंद्रिय खतांचा वापर, योग्य व्यवस्थापन करून मध्यम प्रतीच्या जमिनीत ही नंदनवन उभा करता येते, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले आहे.
शेती विकासाच आदर्श मॉडेल खडकाळ माळरानावर उभा राहिले आहे. कमी पाण्यात कमी कष्टात कमी भांडवलात आंब्याची बाग घेण्याचा विचार केला.
इस्राईल पद्धतीने ८ बाय १२ अंतराने अडीच बाय अडीच खड्डे काढून रोपांची लागण केली. खड्ड्यात थिमेट, निंबोळी पेंड, कॉम्पलेक्स खत, मॅग्नेशिअम, घालून पाला पाचोळा, शेणखत टाकले. ठिबक सिंचन केले.
बनशंकरी नर्सरी अंतराळ (ता. जत) येथून दर्जेदार रोपे आणून लागण केली. दीड फुटावर लागण केली. दोन एकरात ८०० रोपे बसली. आंब्याची विरळ छाटणी मे महिन्यात केली. आंबा खोडाला पेस्ट लावली.
सप्टेंबर महिन्यात पाणी बंद केले. नंतर डिसेंबरपासून आठवड्यातून दोन वेळा पाणी दिले. जून महिन्यात वातावरण बदल झाल्यावर शेणखत, नत्र, स्फुरद व पालाश यांची मात्रा दिली.
मोहोर आल्यावर दर महिन्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी केली. योग्य खताची मात्र दिली आहे. बाग उभा केल्यानंतर तिसऱ्या वर्षी उत्पन्नाला सुरुवात झाली.
बनाळी भागात म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. हा भाग सुजलाम् सुफलाम् झाला आहे. शेगाव क्रमांक दोन तलावाला जाणारा ओढा शेताला लागून गेला आहे.
विहीर खोदली आहे. माळरानावर कमी खर्चात शाश्वत उत्पादन देणारी आंबा फळबागा केली आहे. दोन एकर मोसंबी फळबागेची लागण केली आहे.
आंबा विक्री व्यवस्थापन
- आंबा पाडाला आल्यावर मोठे व्यापारी बांधावर येऊन टनावर खरेदी करतात.
- विक्री व्यवहार रोखीने केला जातो. त्यामुळे विक्री व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येते.
- स्थानिक व्यापारी, खाऊ ग्राहक किलोवर खरेदी करून घेऊन जातात.
- गेल्या वर्षापासून उत्पादन चालू झाले आहे.
- आंब्याचा दर्जा चांगला असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे, अशी माहिती शेतकरी तुकाराम सावंत यांनी दिली.
जत तालुक्यातील वातावरण आंबा पिकाला पोषक आहे. रोगाचा धोका कमी आहे. योग्य व्यवस्थापन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगले उत्पादन सहज घेता येणे शक्य आहे. - तुकाराम सावंत, आंबा उत्पादक, बनाळी, ता. जत
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर