Join us

एकेकाळी मजूर म्हणून काम करणारा हा शेतकरी आज पाच मजुरांना देतोय कायमस्वरूपी रोजगार.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 11:06 AM

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले.

मेहरून नाकाडेरत्नागिरी : बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली नाही. १९९४ साली काही दिवस मजुरीसुद्धा केली. मात्र, वरिष्ठ बंधू कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कुडावळे (दापोली) येथील एकनाथ बाबू मोरे यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले.

शेतीतील त्यांच्या आजवरच्या योगदानामुळेच त्यांना विविध उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असतानाच शेतीतज्ज्ञ विनायक श्रीकृष्ण महाजन यांच्याकडून काही दिवस शेतीचे धडे घेतले.

त्यानंतर पूर्ण वेळ शेतीमध्ये स्वतःला व्यस्त करून घेतले. व्यावसायिक शेतीला महत्त्व दिले आहे. बारमाही शेती करत असून सेंद्रिय शेतीवर त्यांचा विशेष भर आहे. शासनाच्या 'शेतकरी ते ग्राहक' या संकल्पनेचा अवलंब केला आहे.

सुरुवातीला भाडेतत्त्वावर जमीन घेऊन शेती करणारे एकनाथ आता स्वमालकीच्या साडेपाच एकर क्षेत्रावर भाजीपाला व अन्य पिकांची लागवड करून उत्पादन घेत आहेत.

प्रत्येक हंगाम, सणवार या दिवसात कोणत्या भाज्या लागतात याचा अभ्यास करताना, एक दोन भाज्यांऐवजी पाच-सहा प्रकारच्या भाज्या लावल्या, तर विक्रीही हातोहात होते, हे गणित त्यांना उमगले.

पावसाच्या थेंबाथेंबाचा पुरेपूर वापर ते शेतीसाठी करत आहेत. नैसर्गिक शेतीला प्राधान्य देत शेतमालाचा दर्जा राखण्यात यश आले आहे. एकनाथ यांनी काही काळ गावचे सरपंचपदही भूषविले.

सामाजिक कार्याबरोबर गावातील व आसपासच्या गावातील शेतकऱ्यांना एकत्र करत शेतकरी संघटना स्थापन केली, शिवाय दापोली ग्रामोदय फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे.

दररोज विक्रीचा स्टॉलयोग्य नियोजन करून एकाच वेळी विविध भाज्या विक्रीला नेता येतील याचे नियोजन करून लागवड केली जाते. भात, नाचणी, वरी, तीळ, भेंडी, पडवळ, दोडकी, काकडी, कारली, मिरची, दूधी, लाल भोपळा, चिबूड, पालेभाज्या, तोंडली तर कंदमुळात कणघर, सुरण, घोरकंद लागवड करून उत्पादन घेत आहेत. दररोज दापोलीला स्टॉलवर विविध भाज्या एकनाथ स्वतः विक्रीसाठी जातात. ग्राहक त्यांची वाट पाहत असतात.

भेंडी, पडवळचे 'पेटंट' 'शेती वाचली पाहिजे', यासाठी एकनाथ मोरे यांनी शेतकरी संघटना व कंपनीची स्थापना केली. शेतकऱ्यांना ते स्वतः सतत मार्गदर्शन करतात. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. भेंडी व पडवळाचे जुने वाण जतन करून ठेवले असून त्याचे 'पेटंट' घेण्याच्या प्रयत्नात आहेत. एकेकाळी मजूर म्हणून काम करणाऱ्या मोरे यांनी पाच मजुरांना कायमस्वरूपी रोजगार दिला आहे.

शेतकरी असल्याचा मला अभिमान आहे. शेतीमुळे मला रोजीरोटी, प्रतिष्ठा मानसन्मान मिळाला. काळ बदलला, भाजीचे दर बदलले. शेतीतील प्रयोग व काम उत्तरोत्तर वाढतच राहिले. सन २०११ साली मला सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी नावे शेतीतील योगदानाचा पहिला पुरस्कार मिळाला, तो क्षण माझ्या व कुटुंबीयांसाठी अवर्णनीय आनंदाचा राहिला. त्यानंतर विविध संस्थांकडूनही पुरस्कार मिळाले. २०१३ साली वसंतराव शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. आजवरच्या यशात आर्थिक साहाय्य करणाऱ्या बँका, मार्गदर्शन करणारा कृषी विभाग, अधिकारी कर्मचारी यांच्यासह कुटुंबीय, मोठे बंधू कृष्णा व विनायक महाजन, सहकारी शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. - एकनाथ बाबू मोरे, कुडावळे

अधिक वाचा: आष्ट्यातील शेतकऱ्याची दोडका शेतीत कमाल एकरात काढले अडीच लाख रुपयांचे उत्पन्न वाचा सविस्तर

टॅग्स :शेतकरीशेतीकोकणभाज्याकामगाररत्नागिरी