विठ्ठल नलवडे
कातरखटाव : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात नेहमी ऊन-सावलीच्या खेळाप्रमाणे दुष्काळ पाचवीला पुजला आहे. या भागातील पाण्यापासून नेहमी वंचित असलेला शेतकरी आता आधुनिक फळबाग शेतीकडे वळलेला आहे. कातरखटावच्या दुष्काळी पट्टयात 'ड्रॅगन फ्रूट'ची फळबाग जोमाने बहरात आलेली आहे.
खटाव तालुक्यातील शेतकरी नेहमीच रब्बी आणि खरिपाची बाजरी, ज्वारी, गहू, मका, ऊस अशी पिकं घेत आहेत. निसर्गाने हर साल पावसाची चांगली साथ दिली तर ठीक नाहीतर नेहीप्रमाणेच 'येरे माझ्या मागल्या'ची गत असते.
त्यामुळे कातरखटाव येथील जाणकार शेतकरी रवींद्र पाटील यांनी दुष्काळी पट्ट्यात ड्रॅगन फ्रूटची फळबाग लागवड करून काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हल्ली उसाचे गाळप जास्त झाले असून, उत्पादनात खर्च जास्त आहे. बारा ते तेरा महिन्यांच्या उसाच्या उत्पादनात म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याने नवीन आधुनिक पद्धतीच्या फळबागेच्या शोधात शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
ड्रॅगन फ्रूट या फळबागेची लागवड केल्यापासून पंचवीस वर्षांपर्यंत रोपं टिकून राहत असल्याने या फळबागेची निवड केली आहे. या रोपांना उन्हाळ्यात पाणी कमी लागते. आठ दिवसांतून दोन तास ठिबकणे पाणी सोडले तरी झाडे तरतरीत राहतात आणि फळबाग जगू शकते.
खतांचा विचार केला तर ८० टक्के कंपोस्ट खत तसेच २० टक्के रासायनिक व सेंद्रिय खताचा वापर करून दुष्काळी पट्ट्यात ड्रॅगन फळबाग उभी केली आहे. ही नैसर्गिक फळबाग असून, याला कळी आणि फळ येईपर्यंत औषध फवारणी केली जात नाही.
ठरल्याप्रमाणे मे नंतर काटेरी पानाला कळ्या येऊन त्याचं फुलात, नंतर फळात रूपांतर होत आहे. कळी आल्यापासून ४५ दिवसांत झाडाला फळ लागत जाते. पहिल्या वर्षी आठ ते दहा टन उत्पन्न निघत असून, दरवर्षी उत्पादनात दुप्पट वाढ होत जाते. निवडुंगाप्रमाणे ही डोंगराळ, रानटी, नैसर्गिक असून कमी पाण्यात दीर्घकाळ टिकणारी झाडं आहेत.
औषध शून्य लागत असलेल्या या बागेला खत व्यवस्थापनाची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाते. या ड्रॅगन फ्रूट या पिकात शंभर रुपये गुंतवले तर हमखास आठशे ते नऊशे रुपये उभे राहणार, अशी खात्री शेतकऱ्यांना आहे.
पंचवीस वर्षे जगणार हे झाडं... पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. सुरुवातीपासूनच त्रास घेतलेल्या या बागेला कमीत कमी पंचवीस वर्षे आयुष्मान आहे. - रवींद्र पाटील, शेतकरी, कातरखटाव
अधिक वाचा: एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी