Join us

सलग पाच वर्षे सरासरी एकरी ४२ क्विंटल हळद उत्पादन घेऊन या युवा शेतकऱ्याने केला विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:23 AM

नोकरीच्या मागे न धावता आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी चार एकर क्षेत्रातील हळदीतून १७२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्या शेतकऱ्यास ३४ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे.

अतुल जाधवदेवराष्ट्रे : नोकरीच्या मागे न धावता आसद (ता. कडेगाव) येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी चार एकर क्षेत्रातील हळदीतून १७२ क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून त्या शेतकऱ्यास ३४ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले आहे. सलग पाच वर्षे सरासरी एकरी ४२ क्विंटल उत्पादन घेण्याचाही त्यांचा विक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतात शेणखत, मशागत व पीक बदल असला की पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते, हा वडील दिनकर जाधव यांचा कानमंत्र लक्षात ठेवून सुशांत जाधव शेतीत सतत वेगवेगळे प्रयोग करत आहेत.

गेल्या पाच वर्षांपासून शेतीमध्येपीक बदलातून उत्पन्नात मोठी वाढ केली आहे. एकच पीक एका क्षेत्रात सातत्याने न घेता दरवर्षी पीक बदल करत गेल्याने शेतामध्ये निघणारे उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे, असे सुशांत जाधव यानी सांगितले.

दरवर्षी शेतामध्ये एक वर्षाचा गॅप टाकून हळद पीक घेत आहे. गेल्या पाच वर्षांपासून हळद पिकामध्ये एकरी ४२ क्विंटल उत्पन्न मिळवण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. हळद लागवड करण्यापूर्वी एकरी आठ ते दहा ट्रॉली शेणखत टाकून मशागत करून घेतली.

बेड पद्धतीने हळद पिकाची लागवड करून ठिबकद्वारे व पोटपाटाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. माफक खर्च, कमी मजूर व आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे हळद पिकाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते, असा विश्वासही सुशांत जाधव यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, चार एकर क्षेत्रामध्ये १७२ क्विंटल उत्पादन घेऊन ३४ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. अनेक तरुणांनाही शेती कशा पद्धतीने फायदेशीर आहे याबद्दल ते मार्गदर्शन करत आहेत.

दर पाहूनच हळदीची विक्रीहळद काढली की लगेच विक्रीला घेऊन जात नाही. बाजारातील दर पाहूनच हळदीची विक्री केली जाते. तोपर्यंत हळद जवळच्या शीतगृहात ठेवली जाते. यामुळे चांगले पैसे मिळण्यास मदत होत आहे, असेही सुशांत जाधव यांनी सांगितले.

युवकांनी ऊस या पारंपरिक पीक न घेता भाजीपाल्यासह हळद, आले आदी पिके घेण्याकडे लक्ष दिले तर निश्चित शेती फायदेशीर आहे. हळद या पिकाकडे व्यापारी दृष्टिकोनाने उत्पादन घेतले पाहिजे. हळद पिकातून वर्षाला एकरी आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. चांगल्या नोकरीपेक्षाही शेतीत चांगले उत्पन्न मिळत आहे. - सुशांत जाधव, शेतकरी

टॅग्स :शेतीशेतकरीपीकपीक व्यवस्थापनसांगलीलागवड, मशागत