बापू नवले
दौंड तालुक्यातील खुटबाव येथील बाबू व पप्पू बबन थोरात या भावंडांनी व आई शांताबाई यांनी केळीचे खडकाळ जमिनीवर सुमधूर उत्पन्न घेतले आहे.
या केळीच्या गोडव्याने लाखोंचे उत्पन्न त्यांना मिळाले तसेच इराण, इराक व दुबई या देशांमध्ये केळीची निर्यात करून भरघोस बाजार भाव त्यांना मिळाला. ४ एकरामध्ये १५० टन विक्रमी उत्पन्न मिळाले विक्री व्यवस्थापनासाठी त्यांना खुटबाव येथील महेंद्र थोरात यांचे मार्गदर्शन मिळाले. पप्पू थोरात यांनी चार एकर केळीची लागवड केली त्यामध्ये ५५०० रोपे लावली.
मध्यम स्वरूपाची त्यांची जमीन होती, पाण्यासाठी ठिबक सिंचन चा वापर करून सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर केला, रासायनिक खतांचा वापर कमी करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
रोपे खरेदी करताना त्यांनी जैन टिशू कल्चर या प्रकारची रोपे खरेदी केली. डबल ओळ या पद्धतीने त्याची लागवड केली. विद्राव्य खते पिकाच्या वाढीनुसार दिली. यवत येथील साई कृषी सेवा केंद्राचे मालक दादा थोरात यांच्या मार्गदर्शनाने खतांचे व्यवस्थापन केले.
कमीत कमी मनुष्यबळावर आई शांताबाई बबन थोरात, भाचा प्रणव अंकुश चव्हाण, पत्नी प्रियांका पप्पू थोरात यांच्या मदतीने केळीचे संगोपन केले. थोरात कुटुंब यापूर्वी उसाची शेती ते करत होते. मनुष्यबळाचा अभाव होता. त्यामुळे ऊस व्यवस्थापन करणे त्यांच्यासाठी मुश्किल होत होते. केळी पिकाची लागवड केल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याने गोड केळीने सुमधूर उत्पन्न दिले.
अधिक वाचा: कमी खर्चात, कमी जागेत कंपोस्ट तयार करण्याची अतिशय सोपी पद्धत