बापू नवले
दौंड तालुक्यातील ईश्वर वाघ व महेंद्र वाघ या दोन बंधूंची पारगाव येथील शेतीतील नाविन्यपूर्ण उपक्रमातून कारले या पिकात भरघोस उत्पन्न मिळाले. दरवर्षी कारल्याचे उत्पन्न चांगले मिळते एखाद्या वर्ष वगळता दरवर्षी नफ्यात असल्याचे ईश्वर वाघ यांनी सांगितल
मल्चिंगच्या आधारे कारल्याची लागवड केली. शेतीची मशागत करताना पोल्ट्री खताचा वापर केला. वाघ यांच्या घरी मुक्त गाईंचा गोठा आहे त्यातील शेण खताचा डोस त्यांनी दिला. त्यामुळे कारल्याचे दर्जेदार पीक उभा राहिले. शेतीमध्ये ठिबक सिंचन चा वापर केला जातो.
शेजारीच भीमा नदी असून तेथून लिफ्ट केले नाही कारण पाण्याचा अमर्याद वापर केल्यास शेतीची वाटचाल नापिक शेतीकडे होते. जमिनीला मोजके पाणी दिल्यास व ठिबक सिंचन चा वापर करताना योग्य ठिकाणी खताचा वापर होतो. पीक जोमाने वाढते.
पिकाची रोगप्रतिकारशक्ती त्यामुळे चांगल्या पद्धतीने होते. मल्चिंग केल्यामुळे खुरपणीचा खर्च वाचत आहे. मल्चिंगचा दुसरा फायदा जमीन पाण्याला लवकर येत नाही. एकूण पावणेदोन एकरामध्ये वाघ यांनी कारल्याची लागवड केली आहे. परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून कमीत कमी मजुरी कशी लागेल याकडे लक्ष दिले जाते. यासाठी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांचे मोलाचे मार्गदर्शन होते. सध्या तोडणी व औषध फवारणी या दोनच कामांसाठी मजुरांचा वापर केला जातो. कलिंगडाचे पिक देखील त्यांचे भारदस्त असते.
शेतीमध्ये एकाच पिकावर अवलंबून राहणे चुकीचे आहे वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घेतले तर हमखास नफा मिळतो असेही वाघ यांचे मत आहे. त्यामुळे ते कांदा, फ्लावर, कलिंगड, कारले, काकडी यासारखे विविध प्रकारची पिके ते घेतात. उसामध्ये फ्लावर सारखे आंतर पिके घेतात. त्यामुळे उसाचा मशागतीचा खर्च याच पिकातून निघतो.
अंतर्गत पिकाचा उपयोग मशागती बरोबरच कुजवल्यास खतासारखा देखील होतो. रासायनिक खताबरोबर जैविक खताचा देखील वापर करतात. यारा फर्टीलायझरचे आकाश टिळेकर यांचे देखील मार्गदर्शन मिळते.
ईश्वर वाघ यांच्या पत्नी मोनाली, भाऊ महेंद्र, भावजय अर्चना हे सर्व आई सिंधू व वडील अनिल भिमाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. केडगाव येथील नितीन एजन्सीचे नितीन कटारिया व शंकर भुरे यांचे देखील कारले पिकावर रोग नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन मिळते. ईश्वर वाघ यांना शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगाबद्दल 'शेतीनिष्ठ शेतकरी' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
अधिक वाचा: गडगंज पगाराची विदेशी नोकरी सोडून तयार केला स्वतःचा शेतमाल ब्रँड