गोविंद शिंदे
कष्टाला नियोजनाची जोड दिली की माळराना वरील ही शेती फुलवता येते याची प्रचिती नांदेड जिल्ह्यातील बाचोटी (ता. कंधार) येथील युवा शेतकरी शिवहार अशोक पाटील भोसकर यांच्याकडे पाहिल्यानंतर येते.
त्यांनी आपल्या योग्य पीक व्यवस्थापनेच्या जोरावर टोमॅटो पिकांत केवळ ६५ दिवसांच्या आत उत्पन्नास सुरुवात केली. ज्यात सुरुवातीला ८०० रुपये कॅरेटपासून चांगला भाव लागला होता मात्र आता दीडशे रुपये कॅरेट दर मिळतो आहे. तरी पण चार लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न कमावले आहे.
कधी निसर्गाची अवकृपा, कधी बाजारात भाव मिळेना तर कधी अस्मानी सुलतानी संकटामुळे शेतकऱ्याचे नुकसानच होते. यामुळे "शेती नको रे बाबा" अशी ओरड अनेक जण करतात. परंतु अशा स्थितीत न डगमगता नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून शेती फुलवणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांची प्रेरणाही अनेकांना पुन्हा शेती करण्याकडे वळवत असते.
अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांमध्ये बाचोटी येथील शिवहार अशोक पाटील भोसकर हे दरवर्षी आपल्या शेतीतून नवनवीन शेती प्रयोग करत फळबाग व पिक घेऊन आपले वेगळेपण दाखवत असतात. यंदा त्यांनी १० सप्टेंबर २०२४ रोजी वीस गुंठ्यात टोमॅटो लागवड केली होती.
ज्यासाठी सुरुवातीला त्यांनी पाच बाय दीड वर बेड तयार करून शेणखत टाकले. त्यानंतर ठिबक प्रणाली बसवून मल्चिंग अंथरले. यावर त्यांनी ७००० साऊ गावरान टोमॅटो रोपांची लागवड केली.
ज्यातून त्यांना जवळपास ६५ दिवसांच्या आसपास उत्पन्न मिळायला सुरुवात झाली. सुरुवातीला ८० कॅरेटच्या तोडणीला सुरुवात झाली तर आज जवळपास ११० कॅरेट तोडणी होत आहे.
आत्ता पर्यंत जवळपास दहा ते बारा तोडण्या झाल्या असून त्यामध्ये अंदाजे बाराशे कॅरेट टोमॅटोचे उत्पादन निघाले आहे. सुरुवातीला ८०० रुपये कॅरेट दर मिळत होते, परंतु मागील आठ दिवसांपासून दर घसरले असून आज दीडशे रुपये कॅरेट मिळत आहे. तरीही शिवहार अशोक भोसकर यांना चार लाख चाळीस हजार रुपये उत्पन्न आता पर्यंत झाले आहे.
ज्यातून मल्चिंग, रोपे, शेणखत, रासायनिक खते-औषधे, तार, बांबू, सुतळी यांसाठी एक लाख दहा हजार रुपये खर्च वजा जाता निव्वळ नफा तीन लाख रुपये उत्पन्न त्यांना झाले आहे.
कमी शेतीत देखील अधिकचे उत्पादन मिळत असते. त्यासाठी केवळ योग्य नियोजन, रासायनिक खते व औषधे यांचा अचूक वापर, ठिबक सिंचनचे योग्य नियोजन सोबत शेतीप्रती असलेले आपले अपार कष्ट यांच्या जोरावर नक्कीच अधिक उत्पादन मिळते. परंतु योग्य भाव तेवढा काही मिळत नाही. यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य मिळाले तर नक्कीच शेतकरी समृद्ध होईल. - शिवहार अशोक भोसकर, बाचोटी.