मागच्या तीस वर्षांपासूनच्या कष्टाचं फळ आणि अनुभवामुळे आंबेगाव तालुक्यातील भागडी येथील गोपाळ गवारी यांनी पंचक्रोशीत आदर्श टोमॅटो प्लॉट तयार केला आहे. या प्लॉटमधून ते विक्रमी उत्पादनाबरोबर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. ते दरवर्षी २० ते २२ हजार क्रेट टोमॅटो बाजारात विक्री करतात. पिकांची फेरपालट केल्यामुळे ते एकदाही शेतीमध्ये तोट्यात गेले नसल्याचं अभिमानाने सांगतात.
आंबेगाव तालुक्यातील भागडी येथील सरपंच असलेले शेतकरी गोपाळ गवारी हे मागील ३० वर्षांपासून उत्तम पद्धतीने शेती करतात. जुन्नर, आंबेगाव तालुक्यात सोयाबीनसारखे पारंपारिक पिके घेतली जात होती तेव्हापासून त्यांनी आपल्या शेतीमध्ये नाना प्रयोग केले. आपल्या शेतात ते १९९४ साला पासून ते टोमॅटोची शेती करत आहेत. त्यावेळी दिल्लीला टोमॅटोची विक्री होत असे.
नारायणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती २००७ साली सुरू झाली. तोपर्यंत ते पिकवलेले टोमॅटो दिल्लीला पाठवत होते. २००७ सालापासून जुन्नर, आंबेगाव तालुक्यात टोमॅटोची लागवड वाढली. प्रगत तंत्रज्ञानही शेतकरी वापरू लागले. योग्य व्यवस्थापन आणि नियोजनावर गवारी यांचा भर असतो.
व्यवस्थापनफेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये शेतीची नांगरट केली जाते. त्यानंतर व्यवस्थित मशागत करून जमीन कोरडी करून २० मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. ही टोमॅटो ६० ते ६५ दिवसांत म्हणजे १५ ऑगस्ट दरम्यान तोडणीला येतात. एका एकरातून ते २० ते ३० टनापर्यंत उत्पादन घेतात.
एकाच बेडवर ४ पिकेटोमॅटो पीक काढून झाले की, त्यामध्ये वेलवर्गीय पिकाची लागवड केली जाते. यामध्ये काकडी, दुधी भोपळा, कारली, दोडका अशा पिकांचा सामावेश असतो. वेलवर्गीय पिकांसाठीचे स्ट्रक्चर तयार असल्यामुळे फक्त लागवडीचा खर्च पुढील पिकासाठी होतो. त्यामुळे एकाच बेडवर आणि एकाच मल्चिंगवर तीन ते चार पिके घेता येतात असं ते सांगतात.
उसाची लागवड करत नाहीतऊस हे आळशी शेतकऱ्यांचे पीक आहे. ज्या शेतकऱ्यांना कमी कष्ट हवे असतात असे शेतकरी उसाचे पीक घेतात. यामध्ये उत्पन्न कमी मिळते यामुळे मी उसाचे पीक घेत नाही असं गवारी सांगतात. परिणामी उसाचे पीक न घेतल्यामुळे मला फायदाही झाल्याचं त्यांनी लोकमत अॅग्रोशी बोलताना सांगितलं.
शेती एकदाही तोट्यात नाहीएक पीक निघाल्यानंतर त्याच बेडवर तीन ते चार पिके एका वर्षामध्ये घेतात. त्यामुळे एका पिकामध्ये जरी तोटा झाला तरी दुसऱ्या पिकामध्ये त्यांना फायदा होतो. या पद्धतीमुळे त्यांचा जाळी, तार, मल्चिंग, बांबूचा खर्चही वाचतो आणि उत्पन्नही मिळते. या नियोजनामुळे त्यांना शेतीमध्ये एकदाही तोटा झाला नसल्याचं ते सांगतात.
उत्पन्नपावसाळी हंगामात एका एकरातून २० ते ३० टन टोमॅटोचे उत्पादन मिळते. बाजारभाव १० ते १५ रूपये किलोच्या दरम्यान जरी असला तरी ३ ते ४ लाख ५० हजार रूपयापर्यंतचे उत्पन्न एका एकरातून मिळते. साधारण एक ते दीड लाख रूपयांचा खर्च वजा जाता एका एकरातून २ लाखांपर्यंत नफा त्यांना मिळतो.