मेहरून नाकाडे
ट्रकद्वारे मालवाहतुकीत जम बसलेला असताना, बागायती विकसित करण्याचा निर्णय हातखंबा येथील प्रमोद लक्ष्मण सक्रे यांनी घेतला. एकूण १५ एकर क्षेत्रावर त्यांनी हापूस आंबा व काजू, नारळ लागवड केली आहे. याशिवाय कराराने आंबा कलमांच्या बागा घेऊन आंबा व्यवसाय करीत आहेत. ट्रक व्यवसायातून उत्पन्न मिळवत असलेल्या प्रमोद यांना बागायतीची आवड असल्याने त्यांनी शेतीकडे लक्ष केंद्रित केले. १५ एकर डोंगराळ जमिनीची साफसफाई करून एकूण ९०० हापूस कलमांची लागवड केली. लागवडीपासून त्यांनी योग्य खत व्यवस्थापन, पाणी, कीटकनाशके फवारणी, कलमांच्या फांद्याची छटाई वेळच्यावेळी करत असल्याने कलमांची चांगली वाढ झाली आहे.
आंब्याबरोबर ४०० काजू कलमांची लागवड करून काजूची स्वतंत्र बाग विकसित केली आहे. शिवाय ११०० हापूस आंबा कलमे कराराने घेतली आहेत. त्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे आंबा, काजूचे उत्पन्न व दर्जा उत्कृष्ट आहे. सुरुवातीच्या आंब्याला मार्केटमध्ये चांगला दर मिळतो, त्यामुळे ४० टक्के आंबा मार्केटला विक्रीसाठी पाठवतात. तर उर्वरित ६० टक्के आंब्याची खासगी विक्री करतात. स्टॉलव्दारे विक्री करीत असताना मुंबई, पुण्यातील ग्राहक थेट त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यांना घरपोच आंबा सक्रे पाठवतात. थेट विक्रीमुळे त्यांना चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. काजूगर ओला व सुका दोन्ही प्रकारे विकतात, कृषीतज्ज्ञ संदीप डोंगरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभत आहे.
ओल्या काजूगराला मागणी
ओल्या काजूगराला बाजारात चांगली मागणी होते. हातखंबा हे महामार्गावर असल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी उत्तम प्रतिसाद लाभतो. त्यामुळे सुरुवातीला ओला काजूगर काढून किलोवर विक्री सक्रे करत आहेत. हजार ते १२०० रुपये दर मिळतो, वाळलेल्या काजूची ते विक्री करत आहेत. दर चांगला असेल त्याचवेळी विक्री करतात. अन्यथा माल तसाच ठेवत दर वाढल्यावर विक्री केली जाते. ओला काजूगर काढण्यासाठी मेहनत आहे. मात्र दरामुळे विक्री परवडते, असे सक्रे यांनी सांगितले.
योग्य खत व्यवस्थापन
प्रमोद सक्रे आंबा, काजू, नारळ बागायतीसाठी पालापाचोळा, काडीकचरा एकत्र करून तयार केलेले कंपोस्ट खत, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर सर्वाधिक करत आहेत. आवश्यकता भासल्यास रासायनिक खते वापरत आहेत. कीटकनाशक फवारणीसाठी मात्र रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच बागायतींना खते घालत असल्याने खताची मात्रा लागू पडते. डोंगर उतारावर लागवड असली तर योग्य खते, पाण्याची उपलब्धता व अंगमेहनतीमुळे झाडांची वाढ सकस व चांगली झाली आहे.
भात कुटूंबियांपुरता
सक्रे खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून उत्पादित भात कुटुंबाला पुरत असल्याचे सांगितले. सक्रे यांनी १०० नारळ लागवड केली आहे. गावातच नारळाची विक्री होते. नारळाला दरही चांगला मिळत आहे. बागायती लागवडीपूर्वी व पश्चात कृषीतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले असून अद्यापही घेत आहेत. झाडाची योग्य वाढ होण्यासह उत्पादन क्षमता वाढविण्यावर सके यांचा भर आहे. सतत बागायतीकडे लक्ष देत असतात.
यांत्रिक अवजारे वापर
शेतीच्या कामासाठी यांत्रिक अवजारांचा वापर फायदेशीर ठरत आहे. बागायतीमध्ये उगवणारे गवत काढण्यासाठी ग्रासकटरमुळे काही वेळात, कमी खर्चात गवत काढणीचे काम पूर्ण होते. त्याचप्रमाणे आंबा-काजू पिकावरील कीटकनाशक फवारणीसाठी स्प्रे पंपाचा वापर करत आहेत. प्रत्येक झाडाला आवश्यक तितका पाणी पुरवठा व्हावा, पाण्याचा अपव्यय होऊन नये यासाठी बागायतीमध्ये ठिबक सिंचन सुविधा बसविली आहे.
पदवीधर मुलांची शेतीसाठी मदत
प्रमोद यांचा मुलगा व मुलगी दोघेही पदवीधर आहेत. मात्र दोघांनीही नोकरीच्या मागे न लागता वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत आहेत. वडिलांप्रमाणे दोन्ही मुलांना शेतीची आवड असल्याने बागेत वेळप्रसंगी काम करणे, खतांची खरेदी असो वा आंबा काजू विकी या कामात वडिलांना मदत होते. आंख्याचा दर्जा चांगला असेल तर विकी हातोहात होते. त्यामुळे सक्रे यांची दोन्ही मुले ग्राहकांच्या सतत संपर्कात राहून विक्रीसाठी प्रयत्न करतात. ग्राहकांनाही दर्जेदार आंबा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो.