- दत्ता लवांडे
बारामती : भारतीय कृषी क्षेत्रात अनेक नवे वाण किंवा हायब्रीड वाण विकसित केले जातात किंवा परदेशी वाणांची भारतात लागवड केल्याचं आपण ऐकलं असेल. पण पुण्यातील बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सतिश सकुंडे या शेतकऱ्याने चक्क तुर्की येथील बाजरीच्या वाणाच्या आपल्या शेतात लागवड करून चांगले उत्पन्न घेतले आहे.
स्थानिक बाजरीच्या उत्पन्नापेक्षा तुर्की बाजरीचे उत्पन्न तिप्पट निघत असल्याचं शेतकरी सकुंडे सांगतात. त्याचबरोबर तुर्कीची बाजरी महाराष्ट्रात लावल्याने अनेक शेतकरी हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषीक प्रदर्शनात त्यांनी तुर्की बाजरीचा लाईव्ह डेमो प्लॉट शेतकऱ्यांना पाहण्यासाठी ठेवला होता.
दरम्यान, सकुंडे यांचा मुलगा पुण्यातील मॉडर्न कॉलेज येथे शिक्षण घेत असून त्याचा मित्र तुर्की येथे नोकरीला आहे. या मित्राच्या माध्यमातून हे बियाणे उपलब्ध झाल्याचं सकुंडे यांनी सांगितलं आहे.
कणसाची उंची
या वाणाचे वैशिष्ट्ये म्हणजे ही बाजरी तुर्की येथील गावरान बाजरी असून याची उंची १० फुटापर्यंत जाते. त्याचबरोबर कणसाची उंचीसुद्धा तब्बल अडीच ते तीन फुटापर्यंत वाढते. त्यामुळे याचे उत्पादन तीन पटीने वाढते आणि चाऱ्याच्या उत्पादनातही वाढ होते.
दोन्ही हंगामात उत्पन्न
उन्हाळ्यातील फेब्रुवारी, मार्च महिन्यात लागवड करून आणि खरीपातील जून, जुलै महिन्यात लागवड करून दोन्ही हंगामात आपण या बाजरीचे उत्पन्न घेऊ शकतो. यामधून एकरी ३५ ते ४० क्विंटल उत्पन्न निघते असं सकुंडे यांनी सांगितलं. स्थानिक वाणाच्या बाजरीचे उत्पन्न हे साधारण १२ ते १५ क्विंटच्या आसपास निघते. त्यामुळे तुर्की बाजरीचे उत्पन्न स्थानिक बाजरीच्या तुलनेत तीन पट आहे.
या बाजरीमध्ये असेलेले घटक
प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शिअम हे घटक या बाजरीमध्ये असून भाकरी अतिशय मऊ आणि खाण्यास चवदार असल्याचंही ते सांगतात