सतीश सांगळे
इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. गावात दोन पॉलिहाऊस ६५ शेडनेट असून, अजून काही प्रस्तावित आहेत.
शेतात आधुनिक प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करीत नसल्याने उत्पादनातही वाढ होत नाही; मात्र पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीमधील लाल मातीत सोने पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची पॉलिहाऊस व शेडनेट शेतीकडे वाटचाल सुरु आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत ढोबळी मिरची, परदेशी भाजीपाला, काकडी लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. गावात दोन पॉलिहाऊस ६५ शेडनेट असून, अजून काही प्रस्तावित आहेत.
यामध्ये शंभर एकरापेक्षा जास्त शेती शेडनेटखाली आली आहे. शेडनेटमुळे हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथे हरितक्रांती झाली आहे. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या भागातील विहिरींच्या पातळीत झपाट्याने घट झाली होती.
गावाच्या एक हजार हेक्टरपैकी केवळ ४० टक्के शेतीच बागायती होती. या गावांची उपजीविका पूर्णपणे शेतीवरच अवलंबून आहे. गावाचे रुपडे जसे बदलते आहे तसाच बदल शेतीतही दिसू लागला.
खालावलेल्या पातळीला जलसंधारणाच्या कामांनी आधार दिला. नाला खोलीकरण-रुंदीकरण, बंधारे, तलावाचे पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. याचा फायदा सिंचन वाढण्यासाठी होऊ लागला. यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीतही बदल केला आहे.
प्रत्येक वर्षी तेच पीक व त्यावर खतांबरोबर विविध प्रकारच्या औषधांचा मारा यामुळे शेतीचा कस कमी होऊन शेतातील उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवलंबल्यास उत्पादनात वाढ होऊन विकास साधला जाऊ शकतो.
यामुळे येथील विजयराव पवार, तानाजी शिंगाडे, विकास हगारे, आप्पासाहेब हगारे, संदेश शिंगाडे, संदीप झगडे, सतीश गावडे यांनी शेतात आधुनिकीकरणाची गरज लक्षात घेऊन शेडनेट शेतीकडे वाटचाल केली आहे.
शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. शिवारात ढोचळी मिरची, काकडी शेडनेट शेतीद्वारे लागवड करण्यात आली आहे. शेडनेटसाठी लागलेला एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते.
शेडनेट शेतीद्वारे शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगल्या प्रकारचे उत्पादन झाल्याने काही शेतकऱ्यांनी त्यामध्ये वाढ केली आहे. शिवारातील शेडनेटची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत.
शेततळी व ठिंबक सिंचनाचा आधार
अवर्षणप्रवण गावाला जलसंधारणाच्या कामातून भुजल पातळी वाढली; मात्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गावात सुमारे ७० शेततळी असून, टंचाईच्या काळात महत्त्वाची ठरत आहेत, तसेच लागवडीखालील संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन करणयात आले आहे.
महिलांना मिळाला रोजगार
मिरची, टोमॅटो व काकडी, आदीचे उत्पादन शेतकरी शेडनेट शेतीद्वारे घेत आहेत. एका वेळेला २० ते २५ मजूर एका शेडनेट शेतीमध्ये काम करीत आहेत. परिसरातील हजारो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने मजुरांच्या चेहऱ्यावरह समाधान पाहावयास मिळत आहे. अनेक मजुराना शेडनेट शेतीमुळे नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे.
शेतीसाठी पाणी महत्वाचे असून, अगोदर फारशा सुविधा नव्हत्या, पीक पद्धतीत बदल केल्यामुळे याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होत आहे. डोबळी मिरचीचे दर सध्या २५० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. आम्ही पिकविण्याबरोबर चिकण्याचेही तंत्र अवगत केले आहे. आमच्या गावाचे चित्र बदलले आहे. - विजयराव पवार, उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: जुन्नरच्या कॉम्प्युटर इंजिनिअरने लावली बारटोक वांगी अन् करून दाखविली नोकरीपेक्षा शेती भारी