पारंपरिक पिके घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात वाढ होण्यासाठी नवनवीन कृषितंत्रांचा, यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे. याच जाणिवेतून बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मुरादपूर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश प्रताप गाडेकर यांनी पारंपरिक पिकांना बगल देत फळबाग व जोडव्यवसायाद्वारे आर्थिक उन्नती साधली आहे. परिश्रमपूर्वक कोरडवाहू असलेली संपूर्ण शेती ओलिताखाली आणून लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.
मुरादपूर येथील ३८ वर्षीय शेतकरी उमेश गाडेकर यांच्याकडे सात हेक्टर शेती आहे. दहावीचे शिक्षण संपते न संपते तोच त्यांच्यावर अगदी कमी वयातच संपूर्ण शेतीची जबाबदारी येऊन पडली. परिणामी, शिक्षण सोडून त्यांनी संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले.
२० वर्षांपूर्वी त्यांची संपूर्ण शेती ही कोरडवाहू होती. या कोरडवाहू शेतीतून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळणे कठीणच. त्यामुळे त्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत फळ पिकांकडे मोर्चा वळविला खरा; पण, त्यांच्याकडे सिंचनाची सोय नव्हती.
यावर मात करीत गेल्या २० वर्षांत त्यांनी दोन विहिरी, एक बोअरवेल व एक शेततळे तयार करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण शेती ओलिताखाली आणून बागायती शेतीस सुरुवात केली. सुरुवातीला निश्चित उत्पादनाचा स्रोत म्हणून त्यांनी फळबागांवर लक्ष केंद्रित केले. त्या अनुषंगाने माती परीक्षण करून घेत एका हेक्टरवर नागपूर संत्राची लागवड केली.
त्यात आंतरपीक म्हणून सुरुवातीला खरीप कांदा व नंतर रब्बीत करार पद्धतीने कांदा बीजोत्पादन घेतले, तर पुढल्या वर्षी सीताफळाची लागवड केली. त्यात आंतरपीक पपई, सोयाबीन घेण्यास सुरुवात केली.
कृषी विभागाच्या योजनांचा आधार
शेतकरी गाडेकर यांच्या परिश्रमाची दखल घेत कृषी विभागानेही त्यांना वेळोवेळी पाठबळ पुरविले आहे. सिंचनासाठी तुषार व ठिबक संच, ट्रॅक्टरसह कृषी अवजारे, शेततळे आदी साहित्य कृषी विभागाच्या विविध योजनांद्वारे
त्यांना मिळाले आहे. शेतीपूरक देत त्यांनी जोडव्यवसायांवर भर शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुपालनाद्वारे दुग्धव्यवसाय आणि शेततळ्यात मत्स्यपालन या शेतीपूरक जोडव्यवसायांची उत्तम सांगड घातली. शेतमाल थेट ग्राहकांना विकण्यावर त्यांचा भर आहे.