प्रा. संजय देशमुख
रांजणगाव गणपती: पुणे जिल्ह्यातील पुणे नगर हायवेवरील परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या उपनगरामुळे शेतजमिनी नामशेष होत असून त्या जागेवर उंचच उंच इमारती बांधून सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. यामुळे शेतजमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवसेंदिवस शेती कमी होत चालली आहे.
अशाही परिस्थितीत एका ज्येष्ठ दाम्पत्याने आपली शेती कसण्याची हौस भागविण्यासाठी चोहो बाजूंनी असलेल्या सिमेंटच्या जंगलात स्वमालकीच्या दोन गुंठे जागेत सेंद्रीय भाजीपाला शेती करत आहेत.
त्यांनी सेंद्रीय पद्धतीने विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय, वेलवर्गीय भाज्या तसेच फळझाडांची व फुलझाडांची लागवड करून मोठ्या कष्टाने परसबाग फुलवली आहे.
पापाभाई शेखलाल आत्तार व गुलशनबी पापाभाई आत्तार या ज्येष्ठ दाम्पत्याने फावल्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या दोन गुंठे जागेत पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, गवार, मिरची, बटाटा, टोमॅटो, भेंडी, कोबी, फुलकोबी, कारले, दोडका, काकडी, शेवगा या विविध प्रकारच्या भाज्यांची हंगामानुसार लागवड केली आहे.
त्याला जोड म्हणून लिंबू, मोसंबी, पेरू, पपई, आंबा, चिकू, आवळा व कडेने नारळ ही फळझाडे तर दररोजच्या भाज्यांना आपल्या अंतर्भूत गुणांनी स्वाद व सुंगध देण्याचे कार्य करणाऱ्या कडीपत्ता व पुदिनाचीही लागवड केली आहे.
हे कमी की काय म्हणून आत्तार यांनी हरभरा तसेच गुलाब, झेंडूची फुलझाडे लागवड करून परसबागेतही सुंगंध पसरविला आहे. पापाभाई आत्तार यांनी सुरुवातीला काही काळ शाखा पोस्ट मास्टर म्हणून नोकरी केली.
नंतर स्वतंत्र व्यवसाय केला मात्र त्यातही त्यांचे मन रमेना मग त्यांनी आपली स्वतःच्या अल्पशा शेती बरोबर इतरांची शेती वाट्याने घेऊन विविध पिके घेऊन उत्पादन घेतले.
परसबाग करण्याबाबत आत्तार यांनी सांगितले की, तिन्ही मुले आपापल्या प्रपंचात स्थिरस्थावर झाले आहेत. आता आम्हा दोघांना दिवसभर वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडला होता. मात्र शेती करण्याचा छंद स्वस्थ बसू देत नव्हता.
सन २०१८ मध्ये गावाजवळच पुणे नगर हायवेवरील उपनगरात २ गुंठे जागा घेतलेली होती. त्या जागेला काटेरी तारेचे कुंपण केले. परिसरात सर्वत्र उंचंच उंच गगनचुंबी इमारती बांधल्या गेल्या.
आम्ही मात्र आमच्या जागेत विरंगुळा म्हणून परसबाग करण्याचे ठरविले. सकाळी व सायंकाळी फावल्या वेळेत संपूर्ण जागा फावडे टिकावाने खणून घेतली त्यात आवश्यक ते चांगले कुजलेले शेणखत टाकले.
पूर्वीचा शेती करण्याचा अनुभव पाठीशी घेऊन हंगामानुसार पालेभाज्या, फळभाज्या, शेंगवर्गीय तसेच वेलवर्गीय भाज्या घेण्यास सुरुवात केली. मिळणारे ताज्या भाज्यांचे उत्पादन कुटुंबाला वापरू लागलो.
तर जास्त झालेले उत्पादन शेजाऱ्याना वानवळा म्हणून दिला जातो. फळझाडांचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही. मात्र फुलझाडे फुलली आहेत. परसबागेमुळे आमच्या दोघांचाही वेळ सहज निघून जातो.
शिवाय परसबागेत काम केल्याने शरीराला आपोआपच व्यायाम मिळतो परिणामी शरीर ताजेतवाने व तंदुरुस्त राहण्यास मदत होते. परसबागेतील ताज्या भाज्यांचा दैंनदिन आहारात समावेश केल्याने संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ आरोग्यदायी राहते. शिवाय कुटुंबाच्या भाजीपाला खरेदीला लागणाऱ्या पैशाची बचत होते.
रस्त्याने येणारे जाणारे परसबागेजवळ थांबून कुतूहलाने बाग बघतात व आम्ही दोघेही वयाने ज्येष्ठ असल्याने आस्थेने विचारपूस करून आमचे कौतुक करतात. त्यामुळे दोघांचे म्हातारपणही समाधानाने व आनंदाने जात असल्याचे पापाभाई आत्तार यांनी सांगितले.
अधिक वाचा: काय सांगताय! कारल्यापासून करता येतोय चहा, कसा बनवाल वाचा सविस्तर