मेहरून नाकाडे
शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता, शेती करण्याचा निर्णय मालगुंड बाजारपेठ येथील पूजा जाधव यांनी घेतला. तिच्या निर्णयाला पती साईनाथ जाधव यांनी प्रोत्साहन दिले. आंबा बागायती, फूल व भाजीपाला शेती करून उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. सुटी फुले विकण्याबरोबर फुलांचे सुंदर हार, बुके, मंडप, स्टेज सजावट फुलांनी करून देत आहेत.
त्यांची एक हजार आंबा लागवड असून, उत्पादन सुरू झाले आहे. सुरुवातीचा आंबा वाशी मार्केटला विक्रीसाठी पाठविला जातो तर दर गडगडल्यानंतर खासगी विक्रीवर भर देण्यात येतो. आंबा लागवडीला जोड म्हणून त्या भाजीपाला, फूल शेतीची लागवड करत आहेत. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळीत फुले विक्री होतील, त्यानुसार लागवड केली जाते. दुसऱ्या टप्प्यातील फुले मात्र शिमगोत्सव व लग्नसराईदरम्यान उपलब्ध होत आहेत.
पूजा गेली तीन वर्षे अॅस्टर, झेंडू, लिलीची लागवड करीत आहेत. अर्धा एकर क्षेत्रावर त्यांनी वाफे तयार करून त्यावर मच्लिंग पेपर आच्छादून लागवड करीत आहेत. कोल्हापूर येथील नर्सरीतून फुलांची रोपे आणून लागवड करतात. लागवडीपूर्व गांडूळ खत घालण्यात येते. गरज भासल्यास रासायनिक खते देण्यात येतात. त्यांच्या शेतात केशरी, पिवळा झेंडू बहरला असून फुलांचा दर्जाही चांगला आहे. त्यामुळे रत्नागिरी, गावातच विक्री चांगल्या प्रकारे होते. सध्या त्यांनी ५०० अॅस्टरची झाडे, दोन हजार लिलीचे कंद, पाच हजार झेंडूची लागवड केली असून लागवड क्षेत्र फुलांनी बहरले आहे. सध्या फुलांची विक्री सुरू असून, दिवाळीपर्यंत हंगाम चालणार आहे. नवीन प्रयोगात उन्हाळ्यात 'शेवंती'ची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे.
आंबा बागायतीच्या शेजारी जाधव यांची जमीन पडीक होती. पूजा यांनी जमीन लागवडीखाली आणण्याचे निश्चित केले. पती साईनाथ यांच्या सहकार्याने जमिनीची मशागत करून वाफे तयार केले. जमिनीचे काही अंतरावर प्लॉट तयार करून त्यामध्ये पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्यांची लागवड केली तर काही प्लॉटवर फुलांची लागवड केली. खरीप, रब्बी व उन्हाळी शेती करत असून त्यांच्याकडील मजुरांना बारमाही काम मिळाले आहे. केवळ फुलांची विक्री करत नाही तर फुलांपासून आकर्षक हार, बुके, गुच्छ, वेण्या, तोरणे तयार करून विक्री करत आहेत. कल्पकतेच्या वापरामुळे या वस्तूंना अधिक पसंती आहे. फूल शेतीला जोड व्यवसाय सुरू केला आहे. उत्सव, लग्नसराई, कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडील हारांसाठी विशेष मागणी होत आहे.
भाजीपाला, फूलशेती
आंबा उत्पादन घेत असतानाच खर्चाचे नियोजन करत, पूजा जाधव यांनी भाजीपाला, फूल शेती लागवडीचा निर्णय घेतला. मुळा, माठ, पालक पालेभाज्यांसह, हिरवी मिरची, कारली, दोडके, पडवळ, काकडी, दुधी भोपळा, भेंडी लागवड करत आहेत. पाण्यासाठी ठिबक सिंचन, तण नियंत्रणासाठी मल्चिंगपेपर आच्छादन तसेच सेंद्रिय खत व्यवस्थापनामुळे भाज्यांचा दर्जा व उत्पादन सरस असल्यामुळे शेतावरच विक्री होते. स्थानिक बाजारातच चांगला खप होत असल्याचे समाधान आहे.
कल्पकतेची जोड
फुलांची विक्री करत असतानाच काही फुले कोल्हापूर मार्केटमधून मागवून फुलांपासून हार, गुच्छ, तोरणे, वेण्या तयार करून विक्री करत आहेत. शिवा कार्यक्रम स्थळी फुलांची सजावट अस वा वाहनांची सजावटही करून देतात.. कल्पकतेची जोड देत फूल व फुलांपासून हार व अन्य गोष्टी तयार करून विकत आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरात मिळणाचा हारांप्रमाणे सुरेख हार ग्रामीण भागात तयार करण्याचे कसब पूजा यांनी अंगीकारले आहे. व्यवसायासाठी त्याच चांगला फायदा झाला आहे.