Join us

Varsha's Desi Cow Goshala : सेंद्रिय प्रकल्पातून गोशाळेला स्वयंअर्थपूर्ण करणाऱ्या वर्षाची वाचा प्रेरणादायी यशकथा

By रविंद्र जाधव | Published: October 03, 2024 9:54 AM

जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा (Varsha Markad) आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या (Goshala) विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे.

जिव्हाळा निर्माण झाल्याने गोवंश संगोपनात आलेली वर्षा आज १५० हून अधिक गुरांचे संगोपन करत आहे. यासोबतच गोशाळेच्या विविध अडचणींवर तिने आपल्या 'स्वयंपूर्ण गोशाळा' या प्रकल्पातून मात केली आहे.

कानिफनाथांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी (ता. पाथर्डी) येथील वर्षा संजय मरकड हि कोरोना काळात पुण्यातून गावाकडे परतली. ऑनलाईन एमबीए शिक्षण सुरु असताना, वडिलांनी आजोबांच्या नावे २००९ साली उभारलेल्या कै. बाजीराव (आबा) मरकड गोशाळेत वर्षाचे जाणे-येणे वाढले. जेमतेम दोन-चार गुरे असल्याने सर्वांशी जिव्हाळा निर्माण झाला. पुढे, कधी तरी गोशाळेत जाणारी वर्षा नियमितपणे गोशाळेत जाऊ लागली.

दरम्यान, कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करत असताना पोलिसांनी पकडलेले काही गुरे मरकड गोशाळेत देण्यात आले. त्यामुळे गुरांची संख्या वाढली, पण व्यवस्थापन, चारा-पाणी, जखमी गुरांचे औषधोपचार आदी खर्चही वाढला. या सर्व अडचणींतून वर्षाने काही अंशी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यासाठी तिने आज स्वयंपूर्ण गोशाळा या प्रकल्पाअंतर्गत देशी गोवंशांच्या शेणापासून गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. तसेच, गुरांच्या शेणापासून वर्षा अगरबत्ती, धूप, लाकूड, पणती देखील तयार करते. गोशाळेच्या या सर्व कामी वर्षास आई रोहिणी यांची देखील साथ मिळत आहे.

वर्षा सह रोहिणी मरकड.

नावाने पडली गुरांची ओळख

पोलिसांनी, शेतकऱ्यांनी आणून सोडलेल्या गुरांपैकी मरकड गोशाळेत सध्या १६३ गुरे असून पैकी यात ४४ नंदी आहे. यात विशेष की, वर्षा हिने या सर्व गुरांची गिरीधर, क्रिष्णा, श्रावणी, लक्ष्मी, भैरव, मल्हार, बजरंगी याप्रमाणे वेगवेगळी नावे ठेवली असून या नावाने हाक मारताच ती गुरे जवळ येतात. 

गोलक्ष सेंद्रिय खत प्रकल्प

गांडूळ खत तयार करण्यासाठी अद्ययावत शेड उभारले असून त्यात २५ फुट बाय ४ फुट आकाराचे १६ बेड तयार केले आहेत. ज्यात प्रती बेड २५ किलो गांडूळ सोडण्यात आले असून साधारण दोन महिन्यात प्रत्येक बेडमधून गांडूळ खत निर्माण होते. पुढे याची ५० किलो गोणीत विक्री केली जाते. यासोबत याठिकाणी शेणापासून लाकूड, अगरबत्ती, पणती, धूप, गौरी अशी विविध उत्पादने तयार केली जातात. ज्यांची ऑनलाईन विक्री केली जाते. गोलक्ष सेंद्रिय प्रकल्पात तयार होणाऱ्या विविध उत्पादनांपैकी गांडूळ खतास अधिक मागणी आहे आणि सोबत शेणापासून तयार होणाऱ्या लाकडाची देखील महिन्याला ५ टन विक्री होते.

शेणापासून तयार होणारी विविध उत्पादने.

लक्ष गोशाला स्वयं अर्थपूर्णतेचे

देशी गोवंश कमी दूध देत असल्याने, अलीकडे मोजकेच गुरे गोठ्यात आहेत. त्यामुळे शेतकरी गुरांची विक्री करतात किंवा गोशाळेत आणून सोडतात. मात्र, वाढलेल्या बाजारदरांमुळे चारा, पाणी, मनुष्यबळ, औषधोपचार इत्यादी खर्च प्रचंड होतात. परिणामी, या खर्चासाठी मदतीची अपेक्षा समाजातील दानशूर व्यक्तीकडून गोशाळेला असते. मात्र गोशाळेत उपलब्ध होणाऱ्या शेणावर प्रक्रिया करून त्यापासून मूल्यवर्धित सेंद्रिय खते तयार केली गेली, तर या उत्पादनाच्या विक्रीतून आर्थिक भांडवल उभे राहू शकते. यामुळे गोशाला सुरळीत चालवता येईल. यासाठीच मी सध्या प्रयत्न करत असून, याच अनुषंगाने आम्ही स्वयंपूर्ण गोशाला हे मॉडेल तयार केले आहे. - वर्षा संजय मरकड.

हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी

टॅग्स :गायदुग्धव्यवसायशेती क्षेत्रपाथर्डीजागर "ती"चानवरात्रीबाजार