Join us

VermiCompost Success Story : नोकरी सोडून गांडूळ खताच्या व्यवसाय! पुण्यातील सर्वांत मोठ्या गांडूळ खत प्रकल्पाची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 10:40 AM

VermiCompost Success Story : ५० टनावरून आत ते वर्षाकाठी ५०० टन गांडूळ खताची विक्री करतात. पुणे जिल्ह्यातील हा सर्वांत मोठा गांडूळ खत प्रकल्प असल्याचं ते सांगतात.

कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी सोडून ओझर येथील नितीन ढमढेरे यांनी वडिलोपार्जित गांडूळ खत उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय वाढवून ते आज लाखोंची उलाढाल करत असून पुण्यातील सर्वांत मोठा गांडूळ खताचा प्रकल्प तयार केला आहे. केवळ विक्रीच नाही तर ग्राहकांचे समाधान ओळखता आल्याने त्यांनी या व्यवसायात चांगली भरारी घेतली आहे. 

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथील नितीन ढमढेरे हे पुण्यातील एका नामांकित कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करत होते. वडिलोपार्जित शेती असल्यामुळे त्यांचे वडील २००६ सालापासून गांडूळ खताचे उत्पादन करत होते. २१ व्या शतकात शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे येणाऱ्या काळात विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीचा जास्त महत्त्व प्राप्त होणार असल्याच्या विचारातून त्यांनी हा प्रकल्प सुरू केला होता. 

नितीन हे नोकरी करत असताना त्यांची शेतीशी नाळ जुळलेली होती. त्यामुळे त्यांनी शेतीमध्ये नवनवे प्रयोग करायला सुरूवात केली. त्यांनी शेळीपालन, गावरान कुक्कुटपालनाचे प्रयोग केले. पुढे वडिलोपार्जित असलेल्या गांडूळ खताच्या व्यवसायालाच वाढवायचं त्यांनी ठरवलं. 

साधारण १८ वर्षांपासून या व्यवसायात असल्यामुळे त्यांच्याकडून खात्रीशीर गांडूळ खत खरेदी करणारे शेतकरी ठरलेले होते. माल चांगला असल्यामुळे त्यांच्या उत्पादनाची लोकप्रियता वाढत होती. पण आपल्या उत्पादनाचा ब्रँड असावा यासाठी त्यांनी २०२० साली 'सुहा अॅग्रोनिक्स' या कंपनीची स्थापना केली आणि या ब्रँडखाली उत्पादने विक्री करण्यास सुरूवात केली.  

एनरिचमेंट करून खताची विक्रीनितीन यांच्या गांडूळ खताच्या प्रकल्पामधून शेतकऱ्यांना थेट मालाची विक्री केली जात नाही. शेतकरी कोणत्या पिकांसाठी खताचा वापर करणार आहे त्यानुसार खतामध्ये एनरिचमेंट करून खते दिली जातात. गांडूळ खतामध्ये पिकांनुसार अन्नद्रव्ये मिसळले जातात, त्यामुळे सदर पिकांना त्याचा जास्त फायदा होतो. एनरिचमेंट केल्यामुळे शेतकऱ्यांचा आमच्यावरील विश्वास वाढल्याचं ते सांगतात.

अद्ययावत लॅबोरेटरीशेतकऱ्यांच्या शेतातील माती परिक्षण करण्यासाठी, पाण्याचे परिक्षण करण्यासाठी आणि आपण उत्पादित केलेल्या उत्पादनांचे परिक्षण करण्यासाठी नितीन यांच्याकडे अद्ययावत  लॅबोरेटरी आहे. यामध्ये गांडूळ, वर्मीवॉश, दशपर्णी अर्क आणि इतर उत्पादनांचे परिक्षण केले जाते. उत्पादनाचा दर्जा तपासूनच शेतकऱ्यांना माल विक्री केला जातो.

केव्हीकेचे मार्गदर्शनकृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्याकडून व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन लाभले.  नवीन उत्पादनांची निर्मिती आणि उत्पादनातील दर्जा सुधारण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्याचं ते सांगतात.

उत्पादनेसाधारण २०२० मध्ये कंपनीची स्थापना केल्यानंतर ५ ते ६ उत्पादनांमध्ये काम करायला सुरूवात  केली. केवळ गांडूळ खतेच नाही तर त्यांनी वर्मीवॉश, दशपर्णी अर्क, जिवामृत, फॉस्पोकम्पोस्ट, न्युट्रीकम्पोस्ट हे उत्पादने सुहा अॅग्रोनिक्समध्ये तयार आणि विक्री केले जातात.

उत्पन्नसुरूवातील नितीन यांच्या गांडूळ खत प्रकल्पातून केवळ ५० ते ६० टन गांडूळ खताची विक्री होत असे. पण आता त्यांच्याकडून वर्षभरात ५०० टन गांडूळ खत विक्री होते. हा पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठा गांडूळ खत प्रकल्प असल्याचं ते सांगतात. गांडूळ खताला ९ ते १२ रूपये किलोपर्यंत दर मिळत असल्याने साधारणपणे ५० लाखांच्या आसपास या व्यवसायाची उलाढाल आहे. येणाऱ्या काळात गांडूळ खताला मागणी वाढत असून ७०० ते ८०० टनापर्यंत विक्री करण्याचे त्यांचे ध्येय आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीखतेसेंद्रिय शेती