पारंपारिक कपाशी, तुर, बाजरी पिकांकरिता प्रसिद्ध सोबतच कमी पाण्याचा भाग म्हणून प्रचलित असलेल्या मराठवाड्यात आता आधुनिक शेती होतांना दिसून येत आहे. आधुनिक बदलांच्या वाटेवर असलेल्या मराठवाड्याच्या या प्रवाहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या देवगाव या गावाने देखील आघाडी घेतली आहे.
मुख्यतः शेती या व्यवसायावर अवलंबून असलेल्या बाराशे पंधराशे लोकसंख्येच्या या गावातील जवळपास ७०% टक्के शेतकरीअलीकडच्या दोन वर्षांच्या काळात वळाले आहेत. तासाभराच्या अंतरावर जालना आणि बीड हे मराठवाड्यातील रेशीमची प्रसिद्ध बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रेशीम शेती कडे वळाले आहे.
आपल्या वडीलोपार्जित मोसंबी फळबाग, कपाशी, तुरी पिकांना फाटा देत गावाच्या या प्रवाहात विजय साहेबराव ढगे यांनी देखील भाग घेतला. ज्यात गेल्या वर्षीच्या जुलै मध्ये शासकीय अनुदानातून तीन एकर क्षेत्रांवर तुती लागवड केली. ठिबकचा वापर करत त्यासाठी सिंचनाची व्यवस्था केली. पुढे खाजगी बँकेच्या अर्थसहाय्येतून २३ बाय ७० फुटांचा शेड उभारला आणि सुरु विजयरावांचा रेशीम शेतीचा प्रवास.
गेल्या वर्षभरात तुती पाल्याचा अंदाज बांधत सरासरी १०० - १५० अशा अनिपुंजच्या (रेशीम अळी) रेशीम बॅच ढगे यांनी घेतल्या आहे. ज्यास बाजारदर चांगला मिळाल्याने उत्पन्न देखील चांगले मिळाले. सध्या ढगे यांच्या या शेड मधील चौथ्या बॅचचे रेशीम कोष जमा करण्याचे काम सुरु असून ४०० चॉकीच्या या बॅच मधून २.५० ते ३ क्विंटल रेशीम कोष उत्पादन ढगे यांना अपेक्षित आहे.
सध्याच्या ४५० ते ५०० बाजारभावानुसार उत्पादित रेशीम कोष विक्रीतून विजय यांना खर्च वजा जाता. ऐंशी हजार ते एक लाख रुपये निव्वळ नफा मिळणार आहे.
विजय यांचे व्यवस्थापन
शेडच्या बाहेरून हवेद्वारे घातक कीटक येऊ नये यासाठी विजय यांनी शेडला तीन टप्प्यांची सुरक्षा केली आहे. ज्यात सुरूवातीला आतल्या बाजूने मच्छर दानी, पोत्यांच्या पडदा, शेडनेट. या व्यतिरिक्त विजय पत्नी आणि मुलांसोबत रेशीम अळींच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. ज्यामुळेच उत्पन्न चांगले मिळत असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
आषाढात उत्पन्न देणारी रेशीम शेती
आषाढ म्हणजे खरीप पिकांच्या खते व्यवस्थापनाचा, कीड नियंत्रण करण्याचा महिना. यात शेतकरी स्वत:कडील सर्व जमापुंजी खर्च करत शेती व्यवस्थापन करत असतो. ज्याच्या जोरावर अपेक्षित उत्पन्नाची हमी शेतकर्यांना असते. मात्र एवढ सर्व करूनही नैसर्गिक अडचणी, बाजारदर आदींच्या कचाट्यात शेतकरी सापडतो. अशा वेळी रेशीम शेती हा शेतकर्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. अवघ्या महिनाभरात हाती पैसे येत असल्याने आर्थिक अडचणी येत नाही. तसेच काही नुकसान झाले तरी महिनाभराचे होते त्यामुळे शेतकर्यांनी रेशीम शेतीकडे वळायला हवे अस विजय ढगे सांगतात.